सहकार्‍यांसह शिनवात्रा बंदीवासात

By Admin | Updated: May 25, 2014 04:08 IST2014-05-25T04:08:07+5:302014-05-25T04:08:07+5:30

रक्तहीन क्रांतीत सत्ता हाती घेतल्यानंतर लष्कराने आता कारवाई अधिक तीव्र केली आहे.

Shinawatra bans with colleagues | सहकार्‍यांसह शिनवात्रा बंदीवासात

सहकार्‍यांसह शिनवात्रा बंदीवासात

बँकॉक : थायलंडच्या लष्कराने माजी पंतप्रधान यिंगलुक शिनवात्रा यांना व सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अटक केली असून, त्यांना एक आठवडाभर बंदीवासात ठेवले जाईल व विचार करण्यासाठी वेळ दिला जाईल, असे म्हटले आहे. रक्तहीन क्रांतीत सत्ता हाती घेतल्यानंतर लष्कराने आता कारवाई अधिक तीव्र केली आहे. गुरुवारी बंड करून सत्ता हाती घेतल्यानंतर लष्कराने प्रथमच प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली आहे. यिंगलुक व वरिष्ठ नेत्यांना कोठे ठेवले आहे हे लष्कराने सांगितले नाही; पण ते सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. यिंगलुक व नेत्यांना एक आठवडाभर बंदीवासात ठेवले जाईल, थायलंडमधील राजकीय हिंसाचारात त्यांचा सहभाग किती होता हे पाहिले जाईल, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल विंथाई सुवरी यांनी सांगितले. जुंटा लष्कराने बंडानंतरची कारवाई सुरूच ठेवली आहे. आणखी ३५ जणांना चौकशीसाठी बोलावले असून, त्यात राजकीय सल्लागार व शिक्षणतज्ज्ञांचाही समावेश आहे. शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी त्यांची चौकशी आवश्यक असल्याचे लष्कराने म्हटले आहे; पण त्यांना अटक केली जाईल किंवा नाही हे अद्याप स्पष्ट नाही. संघर्षात सहभागी असणार्‍या प्रत्येक गटावर कारवाई केली जाणार असून, त्यांना विचार करण्यास वेळ दिला जाणार आहे. आम्हाला कोणाचेही स्वातंत्र्य संपवायचे नाही, पण ताण कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे लष्कराचे उपप्रवक्ते कर्नल वीराचोन सुकोंधापतीपाक यांनी सांगितले. सर्व राजकीय नेत्यांना चांगली वागणूक दिली जात असून राजकीय तडजोड घडवून आणण्याचा लष्कराचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. नजीकच्या भविष्यात लष्करप्रमुख प्रयुथ चान ओचा हेच पंतप्रधान राहणार आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Shinawatra bans with colleagues