वॉश्गिंटन - मी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यावर खूप निराश आहे. रशियात होणारे मृत्यू रोखण्यासाठी आमचं सरकार लवकरच पाऊल उचलेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. चिनी मिलिट्री परेडचं निमित्त साधून ट्रम्प यांनी हे विधान केले. पुतिन, किम जोंग आणि शी जिनपिंग अमेरिकेविरोधात षडयंत्र रचत आहेत असा आरोपही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, राष्ट्राध्यक्ष शी आणि चीनच्या जनतेला माझ्या शुभेच्छा. कृपया पुतिन आणि किम जोंग उन यांनाही माझ्याकडून शुभेच्छा आहेत. कारण तुम्ही सगळे मिळून अमेरिकेविरुद्ध कट रचत आहात. मी पुतिन यांच्याबद्दल खूप निराश आहे आणि आम्ही लवकरच असे काहीतरी करू ज्यामुळे लोकांचे जीव वाचतील असं त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये अलास्कामध्ये पुतिन यांच्यासोबत एक शिखर परिषद घेतली. यानंतर त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युरोपीय देशांचे नेते आणि नाटो यांची भेट घेतली होती.
तर त्या बैठकीनंतर प्रथम झेलेन्स्की आणि पुतिन द्विपक्षीय बैठक करतील, मग मी स्वतः सामील होतील आणि त्रिपक्षीय बैठक घेतील अशी ट्रम्प यांनी आशा व्यक्त केली होती. परंतु रशिया सतत ही बैठक थांबवत आहे असा झेलेन्स्की यांचा आरोप आहे तर बैठकीचा अजेंडा अद्याप तयार झालेला नाही असा रशियाचा युक्तिवाद आहे. कोणत्याही शांतता करारात अमेरिका युक्रेनच्या सुरक्षेची हमी देईल असं ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना आश्वासन दिले. त्याशिवाय जर रशियाने पुढे येऊन शांतता प्रक्रियेत सहकार्य केले नाही तर अमेरिकेकडून आणखी कठोर निर्बंध लावले जातील असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
दरम्यान, सध्या रशियाने युक्रेनच्या ५ भागांवर कब्जा केला आहे. कुठल्याही शांतता करारात जमिनीची अदला बदल आणि सीमांकन महत्त्वाची भूमिका निभावतील असं ट्रम्प यांनी म्हटलं. तर युक्रेनने स्पष्ट शब्दात आम्ही कब्जा केलेला भाग रशियाचा असल्याचे मानण्यास तयार नाही असं सांगितले आहे. मुलाखतीत ट्रम्प यांना रशिया आणि चीनच्या वाढत्या मैत्रीने चिंता आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर मला बिल्कुल चिंता नाही. आमच्याकडे जगातील सर्वात ताकदवान सैन्य आहे. ते आमच्यावर हल्ला करणार नाहीत असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. त्यात बुधवारी सकाळी पुतिन आणि किम जोंग चीनच्या विक्ट्री परेडमध्ये सहभागी झाले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी या तिन्ही नेत्यांवर निशाणा साधत ते अमेरिकेविरोधात कट रचत असल्याचा आरोप केला.