Russia vs Ukraine: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात शुक्रवारी (28 फेब्रुवारी) व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये वाद झाला. ऑन कॅमेरा झालेल्या या वादाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, या वादाचा सर्वात जास्त फायदा कोणाला झाला असेल, तर तो रशियाला आहे. झेलेन्स्की यांनी अमेरिकेशी पंगा घेतल्यामुळे रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतीन विजयाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.
अमेरिका मदत थांबवणार?व्हाईट हाऊसमध्ये आंतरराष्ट्रीय मीडियासमोर घडलेल्या प्रकारानंतर रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिका युक्रेनला देण्यात येणाऱ्या मदतीत मोठी कपात करू शकते किंवा ही मदत पूर्णपणे थांबवू शकतात. असे झाल्यास रशिया युक्रेनवर ताबा मिळवण्यात किंवा युद्ध जिंकण्यात यशस्वी होईलल. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा युक्रेनला दिलेल्या मदतीच्या रकमेवर प्रश्न उपस्थित केले होते.
अमेरिकेने माघार घेतली तर...आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला तीन वर्षांत एकूण 114 अब्ज युरो दिले आहेत, ज्यात रशियाविरुद्ध आर्थिक, मानवतावादी आणि लष्करी मदतीचा समावेश आहे. युरोपियन देशांच्या 132 अब्ज युरोच्या सामूहिक मदतीपेक्षा हे थोडे कमी आहे. याचाच अर्थ युक्रेनला जगभरातून मिळणाऱ्या मदतीपैकी निम्मी मदत फक्त अमेरिकेतूनच आली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने ही मदत थांबवली तर युक्रेनला रशियाशी युद्ध करणे कठीण होईल. एक-दोन महिन्यांत युक्रेन रशियाला शरण जाण्याची शक्यता आहे.
युद्धात रशियाचेही नुकसानसध्या फ्रान्स आणि ब्रिटनसारख्या अनेक युरोपीय देशांनी युक्रेनला मदतीचे आश्वासन दिले आहे, मात्र अमेरिकेने माघार घेतल्याने युक्रेन आणि रशियाविरुद्ध पाश्चात्य देशांमधील युद्ध निश्चितच कमकुवत होईल. या युद्धात रशियाने युक्रेनवर वर्चस्व गाजवले आणि जवळपास 20% क्षेत्र काबीज केले असले तरी, रशियाचे होणारे नुकसानही कमी नाही. या युद्धात रशियाने हजारो सैनिक गमावले आहेत, त्याचे काही भागही युक्रेनच्या ताब्यात आहेत. युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या आतही अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. युक्रेन हे सर्व करू शकले, कारण त्याला युरोपीय देश आणि अमेरिकेकडून सातत्याने पाठिंबा मिळत होता. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, युक्रेन पराभवाच्या छायेत उभा आहे.