अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्कॉटलंडमध्ये ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत रशियाला अंतिम चेतावणी दिली आहे. "पुढील दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळात युक्रेनवरील हल्ले थांबवा, अन्यथा नवीन निर्बंध आणि शुल्क लादले जातील," असा इशारा ट्रम्प यांनी दिला. या महिन्याच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी मॉस्कोला चेतावणी दिली होती की, जर रशियाने ५० दिवसांच्या आत शांतता कराराला सहमती दर्शवली नाही, तर अमेरिका अत्यंत कठोर शुल्क लादेल. मात्र, सोमवार (२८ जुलै २०२५) रोजी त्यांनी ही मुदत आणखी कमी करत असल्याची घोषणा केली.
स्कॉटलंडमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "मी आजपासून जवळपास १० किंवा १२ दिवसांची एक नवीन मुदत निश्चित करणार आहे. वाट पाहण्यात काही अर्थ नाही." पुढे ते म्हणाले, "आम्हाला कोणतीही प्रगती होताना दिसत नाहीये." याच दरम्यान, ट्रम्प यांनी लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला. त्यांनी सादिक खान यांना बेकार आणि निरुपयोगी ठरवले. विशेष म्हणजे, त्यावेळी त्यांच्यासमोर ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
डोनाल्ड ट्रम्प स्कॉटलंडमधील टर्नबेरी गोल्फ रिसॉर्टमध्ये होते उपस्थित
डोनाल्ड ट्रम्प २८ जुलै २०२५ रोजी त्यांच्या चार दिवसीय खाजगी दौऱ्यावर स्कॉटलंडमधील टर्नबेरी गोल्फ रिसॉर्टमध्ये होते. हा दौरा पूर्णपणे अनौपचारिक होता, परंतु एका पत्रकाराच्या प्रश्नाने संपूर्ण राजकीय चर्चेची दिशाच बदलली. जेव्हा त्यांना सप्टेंबरमध्ये लंडनला जाणार का, असे विचारले असता ट्रम्प यांनी मिश्किलपणे उत्तर दिले की, "होय, मी लंडनला नक्कीच जाईन, पण मी तुमच्या महापौरांचा प्रशंसक नाही. ते बेकार व्यक्ती आहेत." त्यांच्या या वक्तव्याने वातावरण त्वरित तणावपूर्ण झाले. ट्रम्प यांच्यासोबत बसलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत, "तो माझा मित्र आहे," असे म्हटले.
सादिक खान यांची प्रतिक्रिया
लंडनचे महापौर सादिक खान यांनी वैयक्तिकरित्या प्रतिक्रिया दिली नाही, परंतु त्यांचे प्रवक्ते आणि सहकाऱ्यांनी ट्रम्प यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. प्रवक्त्याने सांगितले की, "सादिक यांना ट्रम्प लंडनमध्ये येऊ इच्छितात याचा आनंद आहे. त्यांना लंडनची विविधता आणि सर्वसमावेशक संस्कृतीतून शिकायला मिळेल." याव्यतिरिक्त, खान यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी म्हटले की, "ट्रम्प २०२०ची निवडणूक हरले आहेत, तर सादिक खान यांनी तीन वेळा महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे."