मध्य युरोपीय देश पोलंडनं रशियाचे अनेक ड्रोन्स त्यांच्या हवाई क्षेत्रात पाडल्याचा दावा केला आहे. बुधवारी सकाळी पोलंडने NATO देशांसोबत मिळून त्यांची F16 लढाऊ विमाने उतरवली आणि राजधानी वारसा येथील मुख्य हवाई विमानतळासोबतच एकूण ४ एअरपोर्ट बंद केले आहेत. रशिया युक्रेन युद्धात युक्रेनकडून पोलंडला त्यांच्या हवाई क्षेत्रात रशियाचे ड्रोन्स घुसत असल्याचं सतर्क केले. त्यानंतर पोलंडने ही कारवाई केली आहे. युक्रेनकडून माहिती मिळताच पोलंडच्या वायूसेनेने त्यांची लढाऊ विमाने सज्ज ठेवली आणि काही वेळानंतर रशियाचे ड्रोन खाली पाडले.
पोलंड वायूसेनेने म्हटलं की, वारंवार आमच्या हवाई हद्दीचं उल्लंघन केले जात होते. त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. पोलंडच्या या कारवाईमुळे या भागातील तणाव वाढला आहे. पोलिश आणि NATO देशांची लढाऊ विमाने आमच्या हद्दीत उड्डाण घेत आहेत. जमिनी पातळीवर लष्कर आणि रडार प्रणालीही सज्ज आहे असं सांगण्यात येत आहे. रशियाचे ड्रोन पोलिश क्षेत्रात शिरले होते, ज्यामुळे जमोस्क शहराला धोका निर्माण झाला होता असं युक्रेनने सांगितले.
इराणनिर्मित शाहेद ड्रोनचा वापर?
रशिया-युक्रेन आणि पोलंड यांच्या संघर्षात अमेरिकेचे जो विल्सन यांनी गंभीर आरोप केला आहे. रशियाने पोलंडवर हल्ला करण्यासाठी इराणनिर्मित शाहेद ड्रोनचा वापर केला होता. राष्ट्रपती ट्रम्प आणि पोलंडचे राष्ट्रपती करोल नॉरोकी यांच्या भेटीनंतर एक आठवड्यातच रशियाने इराणी शाहेद ड्रोनचा वापर करून नाटोचा सहकारी देश पोलंडवर हल्ला केला. ही युद्धासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे रशियावर आणखी कठोर निर्बंध लावावेत, जेणेकरून त्यांचे दिवाळे निघेल अशी मागणी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली.
दरम्यान, मागील ३ वर्षापासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे शेजारील देशही हैराण आहेत. त्यात पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी बेलारूसलगतची पूर्वेकडील सीमा बंद करण्याची घोषणा केली आङे. बेलारूसमध्ये रशियन सैन्याचा अभ्यास सुरू आहे. परंतु रशिया आणि बेलारूस यांच्याकडून सातत्याने उकसवण्याचे प्रकार सुरू राहिले तर त्याला योग्य उत्तर देऊ असंही पोलंडचे पंतप्रधान म्हणाले.