Russia Ukraine War: गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाची तीव्रता कमी झाली असली तरी, अधुन-मधून दोन्ही बाजूने लहान-मोठे हल्ले सुरुच असतात. अशातच, या युद्धात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृत्यूप्रकरणी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. ती व्यक्ती केरळची रहिवासी असून, युद्धात रशियन सैन्याकडून लढताना मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने रशियाला लवकरात लवकर रशियन सैन्यात काम करणाऱ्या उर्वरित नागरिकांची सुटका करण्यास सांगितले आहे. रशियन सैन्यात लढणाऱ्या भारतीय नागरिकांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्ही रशियन अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत आणि रशियन सैन्यासाठी काम करणाऱ्या भारतीयांना लवकरात लवकर मुक्त करण्यात यावे, असे सांगितले आहे. भारतीय नागरिकाचा मृतदेह भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
मॉस्कोमधील आमचा दूतावास त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे आणि शक्य ती सर्व मदत केली जात आहे. आम्ही रशियन अधिकाऱ्यांसोबत त्यांचे पार्थिव त्वरीत भारतात परत आणण्यासाठी काम करत आहोत. आम्ही जखमींना मदत केली आहे. त्यांना भारतात परत आणण्याची मागणीही केली, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. दरम्यान, बिनिल टीबी असे मृताचे नाव असून, तो केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील रहिवासी होता.