एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबण्याचे काही संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे या दोन्ही देशांमधील संघर्ष अधिकच तीव्र होत आहे. दरम्यान, मॉस्कोमध्ये एका आलिशान ऑरस लिमोझिन कारमध्ये मोठा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर काही क्षणार्धातच या कारमधून आगीचा मोठा लोळ बाहेर आला. रशियन संरक्षण संस्था असलेल्या एफएसबीच्य मुख्यालयाजवळ हा स्फोट झाला आहे. ही कार व्लादिमीर पुतिन यांची असल्याचा दावा केला जात आहे.
द सनच्या रिपोर्टनुसार व्लादिमीर पुतिन यांनी या स्फोटानंतर सक्त शोधमोहीम सुरू करण्याचे आधेश दिले आहे. या आगीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारमध्ये आग लागल्यानंतर संपूर्ण कार आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. दरम्यान, या कारमध्ये कोण होतं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. ही लिमोझिन कार व्लादिमीर पुतिन यांच्या प्रेसिडेंशियल प्रॉपर्टी मॅनेजमेंट डिपार्टमेंटमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ही घटना लुब्यंकास्थित एफएसबीच्या गुप्त सेवा मुख्यालयाजवळ घडली आहे.
दरम्यान, दुसरीकडे युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या बेलगोरोड क्षेत्रात मोठा हल्ला केला आहे. त्यामुळे रशियाच्या गोटात खळबळ उडाली आहे. बेलगोरोडचे गव्हर्नर व्याचेस्लाव्ह ग्लेडकोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार युक्रेनच्या सैन्याने या हल्ल्याचं वृत्त नाकारलं आहे. गतवर्षी युक्रेनने रशियाच्या कुर्स्क परिसरातील एक हजार चौरस किलोमीटर परिसरावर कब्जा केला होता. मात्र आता रशियाने हा भाग पुन्हा ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांना उत्तर कोरियाच्या सैनिकांकडून मदत होत असल्याचा दावा केला जात आहे.