PM Narendra Modi Vladimir Putin meeting: चीनमध्ये झालेल्या एससीओ शिखर परिषदेदरम्यान, भारत, चीन आणि रशिया या तीन प्रमुख देशांचे प्रमुख एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी एकमेकांना भेटून बैठक घेतली. SCO शिखर परिषदेच्या कार्यक्रमानंतर, पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. एकीकडे अमेरिका सध्या भारतावर अतिरिक्त शुल्क लादत आहे आणि रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून भारताला लक्ष्य करत आहे. यादरम्यान, या दोन्ही देशांच्या प्रमुखांमधील संवाद खूप महत्त्वाचा होता.
चीनमधील एससीओ शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. चीनमधील तैनजिन येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, "ही भेट एक संस्मरणीय बैठक आहे असे मला नेहमीच वाटते. आम्हाला अनेक विषयांवर माहिती सामायिक करण्याची संधी मिळाली आहे. आम्ही सतत संपर्कात राहिलो आहोत. दोन्ही देशांतमध्ये नियमितपणे अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या आहेत. १४० कोटी भारतीय या वर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या आमच्या २३व्या शिखर परिषदेची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे आमच्या विशेष भागीदारीची सखोलता दर्शवते."
रशिया आणि भारत यांच्यातील संबंधांबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि रशिया नेहमीच कठीण परिस्थितीतही खांद्याला खांदा लावून उभे राहिले आहेत. दोन देशांची जवळीक केवळ दोन्ही देशांच्या लोकांसाठीच नाही, तर जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आम्ही युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर सतत चर्चा करत आहोत. शांततेसाठी अलिकडच्या सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. आम्हाला आशा आहे की सर्व पक्ष रचनात्मकपणे पुढे जातील. संघर्ष लवकरात लवकर संपवण्यासाठी आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी मार्ग शोधावा लागेल. हे संपूर्ण मानवतेचे आवाहन आहे.
यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, मोदींना भेटून मला आनंद झाला. SCO शिखर परिषदेदरम्यान आपण भेटत आहोत हे महत्त्वाचे आहे. हे एक व्यासपीठ आहे, जे दक्षिण आणि पूर्वेकडील देशांना एकत्र करते.