अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भर पत्रकार परिषदेत झालेल्या बाचाबाचीचे दुष्परिणाम आता युक्रेनला भोगावे लागणार आहेत. झेलेन्स्की यांच्यासोबतच्या वादानंतर अमेरिकेने युक्रेनला युद्ध सामुग्रीची केली जाणारी मदत रोखली आहे.
झेलेन्स्की यांना खरोखरच शांती हवी आहे असे जोवर ट्रम्प यांना वाटत नाही तोवर ही मदत पुन्हा दिली जाणार नाही असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. तसेच हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याचेही त्याने सांगितले. अमेरिका युक्रेनला रशियाविरोधात लढण्यासाठी वेळोवेळी शस्त्रास्त्रे पुरवित आला आहे. आताची ही मदत एक अब्ज डॉलरची होती. ती रोखण्यात आली आहे.
युरोपमध्ये नाटोच्या देशांसोबत बैठक झाल्यानंतर युक्रेनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपण अमेरिकेसोबत दुर्मिळ खनिजांचा करार करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. परंतू, ट्रम्प यांच्यासोबत संबंध सुधारण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. परंतू, चर्चा बंद खोलीमध्ये करण्याची गरज आहे. जर आम्हाला सुरक्षेची हमी मिळाली आणि युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळाले तर मी पदही सोडण्यास तयार असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने मदत थांबविली तरी रशियापासून धोका असल्याने युरोपने युक्रेनला मदत सुरुच ठेवण्याचा शब्द दिला आहे. यामुळे आता झेलेन्स्की यांची सारी मदार युरोपवर आहे. ब्रिटेनच्या नेतृत्वात झालेल्या या आपत्कालीन बैठकीत एका सुरात युरोपिय देशांनी मदत सुरु ठेवण्यास होकार दिला आहे. तसेच युक्रेनला मदत करण्यासाठी खर्चात वाढ केली पाहिजे असेही एकमत झाले आहे.
अमेरिकेने युक्रेनवर मोठा पैसा खर्च केला आहे. हा करदात्यांचा पैसा आहे, त्या बदल्यात आम्हाला युक्रेनमधील खनिजांचे भांडार मिळावे असा प्रस्ताव ट्रम्प यांनी ठेवला होता. परंतू, त्यास झेलेन्स्की यांनी नकार दिला होता. हा वाद पत्रकार परिषदेतच झाला होता. यावरून अमेरिका आता युक्रेनचा पाठिंबा काढून घेणार व रशिया युक्रेन जिंकणार का, असा सवाल उपस्थित होत होता.