वॉशिंग्टन : पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीत ‘हमास’ने ओलिस ठेवलेल्या सर्वच इस्रायली नागरिकांची तातडीने सुटका करा; अन्यथा ‘खेळ खल्लास’ समजा, असा सज्जड इशारा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. इस्रायलला आवश्यक ती सर्व प्रकारची मदत अमेरिका पाठवत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
हमासने मुक्त केलेल्या आठ इस्रायली नागरिकांची व्हाइट हाउसमध्ये भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करून ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. ‘नंतर नव्हे, आताच सर्व ओलिसांची सुटका करा. ज्यांची तुम्ही हत्या केली आहे, त्यांचे मृतदेह तत्काळ सोपवा; अन्यथा तुमचा खेळ संपला समजा’, अशा शब्दांत ट्रम्प यांनी हमासला दटावले आहे.
१९९७मध्ये ‘हमास’ला अमेरिकेने दहशतवादी संघटना जाहीर केले होते. त्यानंतर आजवर हमासशी कोणत्याही मुद्द्यावर अमेरिकेने चर्चा केलेली नाही. या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे.
युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी नेमले प्रतिनिधी
प्रथमच ट्रम्प यांनी चर्चेसाठी प्रतिनिधी नेमले असून युद्ध थांबवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत चर्चा घडवून आणण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
बुधवारी हमासच्या ताब्यातून सुटका करण्यात आलेल्या आठ इस्रायली ओलिसांनी अमेरिकेत ट्रम्प यांची भेट घेऊन हमासच्या क्रौर्याबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी आता हा इशारा दिला आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिका आक्रमक, युक्रेनसाठी युरोपियन देशांची तातडीची बैठक
ब्रुसेल्स : युक्रेनला दिली जाणारी मदत थांबवण्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करताच युरोपियन युनियनच्या सदस्य देशांनी तातडीच्या बैठकीची तयारी केली आहे. या सदस्य राष्ट्रांनी त्यांच्या लष्करी खर्चासाठीची तरतूद तातडीने वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना, तसेच त्याबाबत परस्पर सहमतीबाबत ही बैठक बोलावली आहे. आपल्या सुरक्षिततेसाठी युरोपला स्वत:हून पुढाकार घ्यावा लागेल, अशी या देशांची भावना आहे.
ट्रम्प यांनी नवी समीकरणे मांडल्याने युरोपीय देश एकवटले आहेत. ट्रम्प यांनी युक्रेनला दिलेले पाठबळ मागे घेत चक्क रशियाशी चर्चा केल्याने युराेपीय देश अस्वस्थ असून, या पार्श्वभूमीवर हे देश तयारीला लागले आहेत.
धोक्याचा इशारा
गेल्या सोमवारी ट्रम्प यांनी युक्रेनला दिली जाणारी लष्करी मदत बंद करण्याची घोषणा केली होती.
एवढेच नव्हे, तर रशियाविरुद्धचे युद्ध थांबवण्यासाठी झेलेन्स्की यांच्यावर त्यांनी दबाव आणला होता. त्यामुळे युरोपला आता धोका असल्याची भावना या देशांमध्ये निर्माण झाली आहे.
युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी युरोपियन युनियनच्या २७ नेत्यांना एक पत्र पाठवून आगामी काळात या भागाला असलेल्या धोक्याचा इशारा दिला आहे.(वृत्तसंस्था)