Donald Trump Tariffs News: 'चीनवर लावण्यात आलेला आयात कर (टॅरिफ) भविष्यात कमी करण्यासाठी आम्ही तयार आहोत', असे मोठे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. आधी चीनविरोधात प्रचंड आक्रमक झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी यामागील कारणही सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समतुल्य टॅरिफ धोरण स्वीकारले. त्यात भारतासह अनेक देशांचा समावेश होता. टॅरिफचा निर्णय जाहीर केल्यानंतर ट्रम्प यांनी त्याला काही महिन्यांसाठी स्थगिती दिली. मात्र, चीनवर लागू करण्यात आलेला टॅरिफ कायम ठेवला. उलट त्यात आणखी वाढ केली. त्यामुळे चीननेही अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवरील टॅरिफ प्रचंड वाढवला.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एनबीसीच्या मीट द प्रेस या कार्यक्रमात बोलताना टॅरिफबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, 'कधीतरी मला टॅरिफ कमी करावाच लागेल. कारण त्याशिवाय आम्ही त्यांच्यासोबत व्यापार करू शकत नाही. उलट त्यांना आमच्यासोबत व्यापार करायचा आहे.'
'चीनवर लागू करण्यात आलेला टॅरिफ कमी करण्यासाठी तयार आहे. कारण सध्या टॅरिफचे जे दर आहे, त्यामुळे जगातील सर्वात दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार ठप्प झाला आहे', असे मत ट्रम्प यांनी मांडले.
अमेरिकेडून १४५ टक्के, तर चीनकडून १२५ टक्के
डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने टॅरिफ लागू केला आहे. चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर अमेरिका सध्या १४५ टक्के टॅरिफ वसूल करत आहे. दुसरीकडे अमेरिकेविरोधात चीननेही जशास तशी भूमिका घेतली असून, १२५ टक्के टॅरिफ अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर लावला आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यात अचानक टॅरिफ युद्ध भडकल्याने याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसले. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मंदावल्याचे दिसून आले. चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १४५ टक्के टॅरिफ लावण्यात आल्याने अमेरिकेत उत्पादनासाठी लागणारी उपकरणे, इतर स्वस्त सामान, कपडे आणि खेळणी हे महाग होण्याची शक्यता वाढली आहे.