अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून टॅरिफ वॉर चालवला होता. मात्र, आता त्यांचे सूर बदलले आहेत. आता त्यांनी भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. यापूर्वी भारतावर विविध वस्तूंवर 'टॅरिफ' लावण्याची भूमिका घेणाऱ्या ट्रम्प यांनी आता पंतप्रधान मोदींना आपला 'उत्तम मित्र' म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेवर आता पंतप्रधान मोदी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रम्प यांच्या या सकारात्मक भावनांचे आणि दोन्ही देशांतील संबंधांबद्दलच्या सकारात्मक मूल्यांकनाचे आम्ही मनापासून कौतुक करतो, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात एक अत्यंत सकारात्मक आणि दूरगामी, व्यापक तसेच जागतिक रणनीतिक भागीदारी असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
अलीकडेच एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी म्हटले होते, "मी आणि मोदी कायम मित्र राहू. ते एक महान पंतप्रधान आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात एक विशेष संबंध आहे आणि यामध्ये कोणतीही चिंतेची बाब नाही. मला नाही वाटत की यात कोणतेही दुमत असेल."
यापूर्वी, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते, "आपण भारत आणि रशियाला सर्वात गडद, सर्वात अंधकारमय चीनच्या हाती गमावले आहे असे वाटते." त्यांनी या पोस्टमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे नेते शी जिनपिंग यांच्यासोबत पंतप्रधान मोदींचा एक जुना फोटो देखील पोस्ट केला होता.