इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध सात दिवसांनंतरही थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे समुद्रात इराणची जहाजे बुडवली जात असताना, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता ईश्वराकडे साकडे घातले आहे. शुक्रवारी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या ऐतिहासिक 'ओव्हल ऑफिस'मध्ये ख्रिश्चन पद्धतीनुसार प्रार्थना केली. या विशेष प्रार्थनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अशा प्रकारे सार्वजनिकरीत्या पूजा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पाद्री आणि सैनिकांसाठी साकडे
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी देशभरातील प्रमुख पाद्र्यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. स्वतःच्या खुर्चीवर बसून ट्रम्प यांनी डोळे मिटून प्रार्थना केली. यावेळी एका पाद्र्याने ट्रम्प यांच्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिले. "हे ईश्वरा, आमच्या राष्ट्राध्यक्षांना हे राष्ट्र चालवण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती प्रदान कर. युद्धभूमीवर लढणाऱ्या आमच्या शूर सैनिक आणि महिलांचे रक्षण कर," अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली. ट्रम्प यांचे सहाय्यक डेन स्केविनो यांनी हा व्हिडिओ शेअर करत 'गॉड ब्लेस अमेरिका' असे म्हटले आहे.
५ वर्षांनंतर पुन्हा युद्धाचा विळखा
२०२१ मध्ये अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतल्यावर अमेरिका कोणत्याही थेट युद्धात उतरली नव्हती. मात्र, २०२६ मध्ये इराणसोबत सुरू झालेल्या या युद्धामुळे अमेरिका पुन्हा एकदा रणांगणात अडकली आहे. २७ फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांनी स्वतः इराणवर हल्ल्याचे आदेश दिले होते. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचे अधिकृतपणे ६ सैनिक शहीद झाले आहेत, ज्यामुळे ट्रम्प सरकारवर देशांतर्गत दबाव वाढत आहे.
अमेरिकन जनतेचा युद्धाला विरोध?
'एक्सिओस'च्या ताज्या सर्व्हेनुसार, ५० टक्क्यांहून अधिक अमेरिकन नागरिक या युद्धाच्या विरोधात आहेत. इराणने प्रत्युत्तरादाखल अरबमधील १२ देशांवर हल्ले केल्यामुळे मध्य-पूर्वेतील मुस्लीम देशांचाही ट्रम्प यांच्यावर दबाव वाढत आहे. खाडीतील दोन महत्त्वाच्या देशांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर उघड नाराजी व्यक्त केली आहे.
दबाव की रणनीती?
एकीकडे इराणचे नौदल संपवण्याची भाषा करणारे ट्रम्प दुसरीकडे व्हाईट हाऊसमध्ये प्रार्थना करताना दिसत आहेत. ही त्यांची स्वतःची मानसिक शांती मिळवण्याची पद्धत आहे की अमेरिकन जनतेला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न, यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Web Summary : Amid the ongoing conflict with Iran, President Trump held a Christian prayer service at the White House. Facing domestic pressure and international concerns over the war, Trump's public display of faith has sparked debate about his motives and the future of the conflict.
Web Summary : ईरान के साथ चल रहे युद्ध के बीच, राष्ट्रपति ट्रम्प ने व्हाइट हाउस में ईसाई प्रार्थना सभा आयोजित की। युद्ध को लेकर घरेलू दबाव और अंतर्राष्ट्रीय चिंताओं का सामना करते हुए, ट्रम्प के सार्वजनिक प्रदर्शन पर उनकी मंशा और संघर्ष के भविष्य को लेकर बहस छिड़ गई है।