महाभियोगाला सामोरे जात असलेले दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी पोलिसांनी त्यांना राष्ट्रपती निवासामध्ये घुसून ताब्यात घेतले. भ्रष्टाचार तपास कार्यालयाने सांगितले की, यून यांना स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे १०.३० वाजता अटक करण्यात आली. याआधी ३ जानेवारी रोजीही यून सुक योल यांना अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यावेळी पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले होते. मात्र यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा घेऊन राष्ट्रपती निवासाध्ये प्पवेश करण्यात यश मिळवले आणि राष्ट्रपती यून सुक योल यांना ताब्यात घेतले. देशात मार्शल लॉची घोषणा केल्यानंतर महिनाभरातच राष्ट्रपतींवर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत विविध माध्यमांमधून मिळत असलेल्या माहितीनुसार पहाटे ४.३० वाजल्यापासूनच अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती निवासाजवळ जमण्यास सुरुवात केली. तर यू यांचे समर्थ आणि विरोधकही तिथे मोठ्या संख्येने गोळा झाले. राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळ सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सुमारे १००० पोलीस अधिकाऱ्यांच्या टीमने राष्ट्रपतींच्या निवासस्थानामध्ये वेगवेगळ्या मार्गांनी प्रवेश केला आणि शिड्यांच्या माध्यमातून आत जात यून यांना ताब्यात घेतले.
सध्याच्या वॉरंटनुसार यून यांना ४८ तास ताब्यात ठेवता येऊ शकतं. त्यानंतर त्यांची कोठडी वाढवण्यासाठी तपास यंत्रणेला नव्या वॉरंटसाठी अर्ज करावा लागेल. विरोधी पक्षांनी १४ डिसेंबर रोजी राष्ट्रपती यून यांच्यावर बंडाचा आरोप करत महाभियोग चालवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर यून यांना राष्ट्रपतिपदावरून निलंबित करण्यात आलं होतं.
या दरम्यान, यून यांच्या वकिलांनी सांगितले की, महाभियोगाचा सामना करत असलेले राष्ट्रपती योल यांच्या टीमने भ्रष्टाचार तपास कार्यालयासमोर उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र सीआयओने हा प्रस्ताव नाकारला आहे. आता यून यांच्याबाबतचा अंतिम निर्णय हा घटनात्मक न्यायालय करणार आहे.