वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. त्याआधी पंतप्रधानांची अमेरिकन NSA माइकल वाल्ट्ज यांनी ब्लेयर हाऊसमध्ये भेट घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून वाल्टज यांच्यासोबतची बैठक यशस्वी झाल्याची महिती दिली. माइकल वाल्ट्ज हे कायम भारताचे चांगले मित्र राहिल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये सांगितले की, एनएसए माइकल वाल्ट्ज यांच्यासोबत नुकतीच फलदायी बैठक झाली. ते नेहमीच भारताचे खूप चांगले मित्र राहिलेत. संरक्षण, तंत्रज्ञान आणि सुरक्षा हे भारत-अमेरिका संबंधांचे महत्त्वाचे पैलू आहेत. आमची या मुद्द्यांवर चर्चा झाली. AI, सेमीकंडक्टर, अंतराळासह अन्य क्षेत्रात अमेरिका भारताला सहकार्य करण्याची दाट शक्यता असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकामागोमाग एक महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत. माइकल वाल्ट्ज हे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनीही नरेंद्र मोदींची भेट घेतली. मस्क यांच्यासोबत वॉशिंग्टन डीसी इथं छान भेट झाली. आम्ही विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यात स्पेस, मोबिलिटी, टेक्नोलॉजी आणि इनोव्हेशनसारख्या मुद्द्यांचा समावेश होता. मी रिफॉर्म आणि मिनिमम गर्व्हनमेंट, मॅक्सिमम गर्व्हनमेंट धोरणाला पुढे नेण्यासाठी भारताच्या प्रयत्नांविषयी चर्चा केली असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या गेस्ट हाऊस ब्लेयर हाऊसमध्ये पोहचल्यानंतर गुरुवारी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे संचालक तुलसी गबार्ड यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीनंतरही मोदींनी ट्विट करून माहिती दिली. तुलसी गबार्ड यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. भारत आणि अमेरिका यांच्या मैत्रीच्या विविध घटकांवर आम्ही चर्चा केली. त्या कायम भारत-अमेरिका यांच्यातील चांगल्या संबंधाच्या समर्थक राहिल्यात असा उल्लेख मोदींनी आवर्जून केला.