PM Modi calls Sushila Karki: भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या नवनियुक्त अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केल्याचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स पेजवरून पोस्ट करत सांगितले. नेपाळमधील भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी नुकतीच सिंह दरबार येथे सुशीला कार्की यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली होती. श्रीवास्तव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने कार्की यांना अभिनंदन संदेश दिला. तशातच आज पंतप्रधान मोदी यांनी स्वत: कार्की यांच्याशी चर्चा केली.
पंतप्रधान मोदी यांनी आज आपल्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत कार्की यांच्याशी संवाद साधल्याचे सांगितले. मोदी पोस्टमध्ये म्हणाले, "नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान श्रीमती सुशीला कार्की यांच्याशी सुसंवाद साधला. अलिकडच्या काळात झालेल्या दुःखद जीवितहानीबद्दल मनापासून शोक व्यक्त केला आणि शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना भारताचा दृढ पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. तसेच, उद्याच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मी त्यांना आणि नेपाळच्या लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या."
दरम्यान, दोनच दिवसआधी नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने X वर पोस्ट केले की भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी पंतप्रधान मोदींचा त्यांच्या नेपाळी समकक्षांना अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन संदेश दिला. आपल्या अभिनंदन संदेशात, पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमधील सहकार्य आणि मैत्रीचे घनिष्ठ संबंध अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्याची भारताची वचनबद्धता व्यक्त केली.
कार्की रविवारी नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील सरकारी बंदीवरील तरुणांच्या निषेधानंतर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय अनिश्चिततेचे दिवस यामुळे संपले. नवीन सरकार ५ मार्च २०२६ रोजी निवडणुका घेणार आहे.