PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. 'भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक दीर्घ आणि महत्त्वाची चर्चा झाली, यामध्ये द्विपक्षीय सहकार्य आणि जागतिक राजनैतिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली', अशी माहिती आपल्या एक्स पोस्टमध्ये झेलेन्स्की यांनी दिली.
युक्रेनियन जनतेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी पीएम मोदी यांचे आभार मानले. " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या अलिकडच्या हल्ल्यांबद्दल, विशेषतः झापोरिझिया येथील बस स्थानकावरील हल्ल्याबद्दल माहिती दिली, यामध्ये डझनभर लोक जखमी झाले होते", असेही झेलेन्स्की म्हणाले.'युद्ध संपवण्याची राजनैतिक शक्यता दिसत असताना, रशिया केवळ आक्रमकता आणि हत्या सुरू ठेवण्याची इच्छा दाखवत आहे', असंही या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनीही एक्स पोस्ट केली.'राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याशी बोलून आणि अलिकडच्या घडामोडींबद्दल त्यांचे विचार जाणून घेऊन मला आनंद झाला. संघर्षाच्या लवकर आणि शांततापूर्ण निराकरणाच्या गरजेबद्दल भारताची ठाम भूमिका मी त्यांना कळवली. भारत या संदर्भात शक्य तितके सर्व योगदान देण्यास तसेच युक्रेनसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे', असं मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
झेलेन्स्की म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या शांतता प्रयत्नांना पाठिंबा दिला. 'युक्रेनशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये युक्रेनचा सहभाग अनिवार्य आहे यावर भारत सहमत आहे. त्याशिवाय कोणताही करार निरर्थक ठरेल आणि त्याचे कोणतेही परिणाम होणार नाहीत. झेलेस्कींनी सांगितले की, त्यांनी रशियाविरुद्धच्या निर्बंधांवरही भारतीय पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी भेटीसाठी सहमती दर्शवली
झेलेन्स्की म्हणाले की, पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेत त्यांनी रशियाची युद्धासाठी निधी देण्याची क्षमता कमी करण्यासाठी रशियन ऊर्जेवर, विशेषतः तेल निर्यातीवर निर्बंध लादण्याची गरज यावर भर दिला. ते म्हणाले, 'रशियावर प्रभाव टाकू शकणाऱ्या प्रत्येक नेत्याने मॉस्कोला स्पष्ट संदेश द्यावा.' सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान दोन्ही नेत्यांनी वैयक्तिक बैठक घेण्याचे मान्य केले. झेलेन्स्की म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनला भेट देण्याचे आमंत्रण दिले आणि भारतीय पंतप्रधानांनीही त्यांना भारताला भेट देण्याचे आमंत्रण दिले. यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.