Peru food court roof collapse : लीमा: पेरूमध्ये एका शॉपिंग मॉलमधील फूड कोर्टचे छत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास ७८ जण जखमी झाले आहेत. याबाबत देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ला लिबर्टाड प्रदेशातील ट्रुजिलो शहरातील रिअल प्लाझा ट्रुजिलो शॉपिंग मॉलमधील फूड कोर्टमध्ये उपस्थित असलेल्या लोकांवर एक जड लोखंडी छत कोसळल्यामुळे ही घटना घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास ७८ जण जखमी झाले आहेत.
संरक्षण मंत्री वॉल्टर एस्टुडिलो यांनी पत्रकारांना सांगितले की, स्थानिक अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, छत कोसळल्यानंतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि आणखी एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींपैकी ३० जणांना रुग्णालयातून उपचारानंतर सोडण्यात आले आहे. तर ४८ जण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरूस्थानिक अग्निशमन विभागाचे प्रमुख लुईस रोनकल यांनी सांगितले की, बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर ट्रुजिलोचे महापौर मारियो रेयना यांनी शॉपिंग मॉल बंद करण्याची घोषणा केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.