खारतूमः सुदानमधल्या कुपोषित सिंहांचे फोटो व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या सिंहांना वाचवण्यासाठी आता ऑनलाइन पद्धतीनं मोहीम चालवण्यात येत आहे. सुदानची राजधानी खारतूमच्या सिंहांचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. त्या फोटोमध्ये सिंह फारच कुपोषित दिसत आहेत. या सिंहांना चांगल्या ठिकाणी पाठवण्यासाठी लोकांनी आता मोहीम चालवली आहे. जेणेकरून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. सुदानची राजधानी असलेल्या एका पार्कमध्ये असलेल्या या सिंहांची हालत गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खारतूमच्या अल कुरैशी पार्कमध्ये पाच सिंह पिंजऱ्यात कैद आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. जेवण आणि औषधांअभावी त्यांच्या बरगड्यासुद्धा दिसू लागली आहेत. फेसबुकवर उस्मान सलीह यांनी आपला पार्कमधील अनुभवही कथन केला आहे. जेव्हा पार्कमध्ये ही या सिंहांना पाहिलं तेव्हा पायाखालची जमीनच सरकली. मी त्यांच्यासाठी एक ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. पार्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गेल्या काही आठवड्यांपासून सिंहांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांची शरीरातील जवळपास दोन तृतीयांश मांस कमी झालं आहे.
सुदानमधल्या कुपोषित सिंहांचे फोटो व्हायरल, बचावासाठी मोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 10:49 IST