ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर भलतेच सुटले आहेत. अमेरिकेत जाऊन भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी देत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांचा त्यांना पाठिंबा असल्याने अमेरिकेच्या जमिनीवरून मुनीर बरळत असले तरी या गोष्टी अमेरिकन आजी-माजी अधिकाऱ्यांना पटलेली नाहीय. पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याने मुनीर हे दुसरे लादेन असल्याची टीका केली आहे.
ओसामा बिन लादेनला अमेरिकेनेच मोठे केले होते, शस्त्रे पुरवून अमेरिकेनेच लादेनचा वापर केला होता. हा लादेननंतर अमेरिकेवरच उलटला होता. अमेरिकेचे वर्ल्ड ट्रेड सेंटर विमाने घुसवून उडवून देण्यात आले होते. पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी मुनीर याला लादेनची उपमा दिली आहे. असीम मुनीर हा लष्करी सूट घातलेला ओसामा बिन लादेन आहे. पाकिस्तानला कितीही सूट दिली तरी त्याच्या विचारांत बदल होणार नाही, असे रुबिन यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचा प्रमुख गैर-नाटो सहयोगी देशाचा दर्जा काढून टाकावा आणि त्याला दहशतवादाला प्रायोजक देश म्हणून घोषित करावे, अशी मागणीही रुबिन यांनी केली आहे. मुनीर याला पर्सना नॉन ग्राटा घोषित करावे. अमेरिकन व्हिसा मिळण्यापासून बंदी घालण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याचे वक्तव्य या लष्करप्रमुखाने अमेरिकेत केले. यावेळी अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याला लगेचच हाकलून द्यायला हवे होते. ३० मिनिटांच्या आत त्याला देशातून हाकलून लावायला हवे होते, विमानतळावर नेऊन अमेरिकेतून बाहेर पाठवायला हवे होते, असेही रुबिन म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प हे एक व्यापारी आहेत आणि त्यांना खरेदी-विक्रीची सवय आहे. त्यांना हे समजत नाही की वाईट शांतता करार युद्धाला चालना देऊ शकतो. त्यांना नोबेल शांतता पुरस्कार जिंकायचा आहे, अशी टीका त्यांनी ट्रम्प यांच्यावर केली आहे.