Pakistan Army: "जर आम्ही तुमचे सैनिक नव्हतो, तर आम्हाला भरती का केले? आमचे ओळखपत्र खोटे आहे का? असा आर्त सवाल करत पाकिस्तानी लष्कराचे जवान कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडत आहेत. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीने ओलीस ठेवलेल्या पाकिस्तानी सैनिकांचा एक धक्कादायक व्हिडिओ जारी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, स्वतःचेच सैनिक शत्रूच्या कैदेत असताना पाकिस्तान सरकारने हे आमचे सैनिकच नाहीत, व्हिडिओ बनावट आहे, अशी भूमिका घेतल्याने हे जवान आता आपल्याच सरकारवर संतापले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बलुच लिबरेशन आर्मीने ऑपरेशन हेरोफ'च्या दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानी लष्कराच्या नियमित तुकड्यांमधील ८ सैनिकांना कैद केले आहे. या सैनिकांच्या सुटकेच्या बदल्यात बीएलएने पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या बलुच कैद्यांच्या सुटकेची मागणी केली होती. यासाठी २२ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र, पाकिस्तानी लष्कराने आपले सैनिक बेपत्ता असल्याचे मान्य करण्यास नकार दिला. लष्कराच्या या भूमिकेनंतर बीएलएने सैनिकांचा नवा व्हिडिओ समोर आणला आहे.
"अल्लाहसाठी आम्हाला स्वीकारा"; सैनिकांचा आक्रोश
व्हिडिओमध्ये कैद केलेले सैनिक आपले लष्करी ओळखपत्र आणि राष्ट्रीय ओळखपत्र कॅमेऱ्यासमोर दाखवत आहेत. एक सैनिक रडत म्हणतो, "माझे वडील अपंग आहेत, मी घरात सर्वात मोठा आहे. मी पाकिस्तानसाठी लढलो आणि आज लष्कर म्हणतंय की मी त्यांचा जवान नाही? हे कोणाचे कार्ड आहे? हे तुम्हीच दिले होते ना?"
दुसरा सैनिक म्हणतो, "जर तुम्ही आम्हाला नाकारणार होतात, तर आम्हाला भरती कशाला केले? हा व्हिडिओ बनावट नाही, आम्ही तुमचेच आहोत, कृपया आम्हाला वाचवा." या व्हिडिओत किमान ८ जवान गुडघ्यावर बसलेले दिसत असून त्यांच्या मागे बंदुकधारी बलुच बंडखोर उभे आहेत.
२२ फेब्रुवारीला मृत्यूदंड?बीएलएच्या हक्कल या मीडिया विंगने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान सरकारकडे आता अवघे २-३ दिवस उरले आहेत. जर २२ फेब्रुवारीपर्यंत कैद्यांच्या अदला-बदलीवर चर्चा सुरू झाली नाही, तर या सर्व पाकिस्तानी सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. बलुच बंडखोरांनी यापूर्वी काही स्थानिक पोलिसांना सोडून दिले होते, मात्र लष्करी जवानांच्या बाबतीत त्यांनी कडक भूमिका घेतली आहे.
पाकिस्तानचा जुनाच इतिहास
स्वतःच्या सैनिकांना नाकारण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ नाही. १९४७, १९६५ आणि कारगिल युद्धाच्या वेळीही पाकिस्तानने आपल्या मृत सैनिकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. दहशतवाद्यांना तर पाकिस्तान कधीच आपले मानत नाही, मात्र आता गणवेशातील अधिकृत सैनिकांनाही वाऱ्यावर सोडल्याने जगभरातून पाकिस्तानवर टीका होत आहे.
बलुचिस्तान पेटलंय!
खनिज संपत्तीने समृद्ध असूनही बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात गरीब प्रांत आहे. येथील संसाधनांची लूट होत असल्याचा आरोप करत बीएलए ही संघटना २००० सालापासून पाकिस्तान आणि चीनच्या प्रकल्पांविरुद्ध गनिमी काव्याने लढत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल टेररिज्म इंडेक्स २०२५ नुसार, पाकिस्तान हा जगातील दुसरा सर्वात जास्त दहशतवाद प्रभावित देश बनला आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान या भागात दहशतवादी घटनांमध्ये ९० टक्के वाढ झाली आहे.
Web Summary : Baloch rebels captured Pakistani soldiers, demanding prisoner exchange. Pakistan disowns them, sparking outrage. Soldiers plead for acceptance, fearing execution as the deadline nears. This isn't the first time Pakistan has abandoned its own.
Web Summary : बलूच विद्रोहियों ने पाकिस्तानी सैनिकों को पकड़ लिया, कैदी विनिमय की मांग की। पाकिस्तान ने उनसे किनारा किया, जिससे आक्रोश फैल गया। सैनिकों ने फांसी के डर से स्वीकार किए जाने की गुहार लगाई, क्योंकि समय सीमा नजदीक है। यह पहली बार नहीं है जब पाकिस्तान ने अपने ही लोगों को छोड़ा है।