युक्रेनविरोधात लढण्यासाठी रशियानेचीन आणि पाकिस्तानचे भाड्याने मिळणारे सैनिक घेतल्याचा आरोप युक्रेनी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. एवढेच नाही तर ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान आणि आफ्रिकी देशांमधूनही रशिया अशा लोकांना युक्रेनविरोधात लढवत आहे, असे ते म्हणाले आहेत.
आम्ही एका अशा क्रूर युद्धात झुंझत आहोत ज्याने असंख्य बळी घेतले आहेत, लाखो लोक विस्थापित झाले आहेत, असे झेलेन्स्की म्हणाले. यापूर्वी उत्तर कोरियाचै सैनिक युक्रेन युद्धात उतरल्याचे समोर आले होते. आता पाकिस्तान आणि चीन देखील रशियाला सैन्य पुरवत असल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे.
खारकीवमध्ये झेलेन्स्की यांनी युक्रेनी सैन्याची भेट घेतली. तेव्हा तेथील सैनिकांनी याची माहिती दिल्याचे ते म्हणाले. रशियाने त्यांच्या देशाविरुद्धच्या युद्धात १०० हून अधिक चिनी नागरिकांना तैनात केले होते असा दावा झेलेन्स्की यांनी यापूर्वीही केला होता. आता पाकिस्तानची त्यात एन्ट्री झाली आहे. डोनेत्स्क प्रदेशात दोन चिनी सैनिक पकडल्याचे त्यांनी म्हटले होते. एक व्हिडिओ देखील शेअर केला होता परंतु चीनने हे दावे फेटाळून लावले होते. पुन्हा एकदा कीवने रशियावर चिनी सैनिकांची भरती केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, हे सैनिक कुर्स्क प्रदेशात पाठवण्यात आले आहेत.