पाकिस्तानमधील मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री हुमेरा असगर हिच्या संशयास्पद मृत्युमुळे खळबळ उडाली आहे. तिचा मृतदेह या आठवड्यात कराचीमधील एका अपार्टमेंटमध्ये सापडला होता. दरम्यान, हुमेरा असगर हिच्या मृत्यू प्रकरणामध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिचा मृत्यू हा सुमारे नऊ महिने आधीच झाला होता. मात्र एवढे महिले लोटल्यानंतरही तिच्याबद्दल कुणालाच काही माहिती मिळाली नव्हती.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार हुमेरा हिचा मृत्यू हा २०२४ मध्ये ऑक्टोबर महिन्यात झाला होता. मात्र तिचा मृतदेह हा पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत हल्लीच राहत्या घरी सापडल्याने पोलिसही अवाक् झाले होते. हुमेरा हिच्या मृतदेहाचं मागच्या बऱ्याच दिवसांपासून विघटन होत होतं, अशी माहिती तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करणाऱ्या डॉ. सुमैय्या सईद यांनी सांगितलं.
वरिष्ठ पोलीस अधिकारी सय्यद असद रजा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हुमेरा असगर हिच्या फोनचा सीडीआर काढला असता तिने शेवटचा फोन गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केल्याचे समोर आले होते. तर बिल न भरल्याने तिच्या अपार्टमेंटचा विजपुरवठा हा ऑक्टोबर २०२४ मध्ये कापण्यात आला होता. त्यावरून हुमेरा हिचा मृत्यू हा खूप आधी झाला असावा, हे सिद्ध होत आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, हुमेरा हिच्या घरात ठेवलेलं अन्न कुजलेलं होतं. तसेच भांड्यांना गंज लागला होता. नळ सुकलेले होते. तसेच तिच्या घरातील बहुतांश वस्तूंची एक्स्पायरी डेट संपलेली होती. एवढंच नाही तर शेजाऱ्यांनीसुद्धा हुमेरा हिला गेल्यावर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात पाहिलं होतं. हुमेरा ज्या मजल्यावर राहत होती. त्या मजल्यावर आणखी केवळ एकच अपार्टमेंट होती. मात्र ती बंद होती. त्यामुळे हुमेरा हिचा मृत्यू होऊन बरेच दिवस लोटले तरी तिच्या मृतदेहाची दुर्गंधीही कुणाला आली नाही. दरम्यान, हुमेरा हिच्या कृटुंबीयांनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.