Pakistan Air Strike in Khyber Pakhtunkhwa: पाकिस्तानी हवाई दलाने सोमवारी सकाळी खैबर पख्तूनख्वाच्या तिराह खोऱ्यातील एका गावावर बॉम्बहल्ला केला, ज्यामध्ये अंदाजे ३० लोक मारले गेले. पाकिस्तानी हवाई दलाने बॉम्ब टाकण्यासाठी चिनी बनावटीच्या JF-17 लढाऊ विमानांचा वापर केला. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी हवाई दलाने तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावात टीटीपी बॉम्ब बनवण्याच्या सुविधेवर हल्ला केला. तथापि, स्थानिकांचे म्हणणे आहे की या हल्ल्यात दहशतवादी अड्ड्यांवर नव्हे तर नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले गेले. पाकिस्तानचा दावा आहे की टीटीपी त्यांच्या भूमीवर हल्ले करत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू होत आहे. पाकिस्तानने अफगाण तालिबानवर टीटीपीला आश्रय दिल्याचा आरोप केला आहे. याच दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तानचे लवकरच तुकडे तुकडे होतील, असा इशारा दिला.
खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डोंगराळ भागात नागरिकांवर झालेल्या बॉम्बहल्ल्याचा उल्लेख करत सालेह यांनी इशारा दिला की पाकिस्तानचे आता तुकडे तुकडे व्हायला सुरूवात झाली आहे. पश्तून लोकांना पाकिस्तानच्या सरकारने नेहमीच दुर्लक्षित ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. सालेह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, जर पाकिस्तानी हवाई दलाने असा प्रकार पंजाब प्रांतात केला असता आणि त्यात २३ नागरिक मारले गेले असते तर काय झाले असते? असा खोचक सवाल करत त्यांनी पाकिस्तानी सरकारचा पक्षपातीपणा अधोरेखित केला.
सालेह यांनी पुढे लिहिले की, पूर्वीच्या FATA (आदिवासी प्रदेश) चे लोक नेहमीच पाकिस्तानी समाजात दुर्लक्षित राहिले आहेत. पाकिस्तानच्या मुख्य प्रवाहातील उर्दू किंवा इंग्रजी माध्यमांनी या हल्ल्याचे वृत्तांकन केले आहे की नाही याबाबत मला शंकाच आहे. पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील. हा हल्ला पाकिस्तानच्या विघटनाची सुरुवात तर नाही ना? मला तर नक्कीच वाटते की ही सुरूवात आहे.
टीटीपी हे तालिबानने पाकिस्तानात बनवलेले विष
तालिबानचा विरोधक असलेले अमरुल्लाह सालेह यांनी अफगाण तालिबान आणि टीटीपीला पाकिस्तानात बनवलेले विष म्हटले. सालेह म्हणाले की पाकिस्तानी सैन्याकडे या विषाचा उतारा आहे, परंतु एफ-१६ विमानांमधून नागरिकांवर बॉम्ब टाकणे हा पर्याय असून शकत नाही. मला आशा आहे की पाकिस्तानचे संरक्षण मंत्री यावर विचार करतील.