बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील जाफर एक्स्प्रेसचं अपहरण करत शेकडो प्रवाशांना ओलीस ठेवलं आहे. दरम्यान, या ट्रेनमध्ये ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी पाकिस्तानी सैन्याकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. मात्र बलूच अपहरकर्त्यांकडून होत असलेल्या तिखट प्रतिकारामुळे पाकिस्तानचं लष्कर जेरीस आलं असून, सरकारच्या तोंडचं पाणी पळालं आहे. आतापर्यंत पाकिस्तानचे २० सैनिक ठार झाले आहेत. आता या बलूच दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून एअरस्ट्राईकची तयारी केली जात आहे.दरम्यान, बलूच लिबरेशन आर्मीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही कारवाई ऑपरेशन बीएलएच्या मजीद ब्रिगेड फतेह स्क्वाड आणि एसटीओएस यांच्याकडून केली जात आहे.
याबाबत आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपहृत ट्रेन ज्या पर्वतीय भागात आहे तो भाग गोळ्यांच्या आवाजाने थरारून जात आहे. दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार होत आहे. तसेच बलूच दहशतवादी हे पूर्ण तयारीनिशी आल्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांकडे तोफा असून, ते पाकिस्तानी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सनां लक्ष्य करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांना आगेकूच करता येत नाही आहे.
ट्रेनमधील सर्व ओलीस प्रवासी बीएलएचं आत्मघातकी पथक असलेल्या मजीद ब्रिगेडच्या ताब्यात आहेत. बलूच लिबरेशन आर्मीचा प्रवक्ता जीयंद बलूच याने सांगितले की, जर पाकिस्तानचं लष्कर आलं तर ओलिसांना ठार मारा आणि माघार न घेता अखेरपर्यंत संघर्ष करा, असे आम्हाला स्पष्ट आदेश आहेत.
बलूच बंडखोर पाकिस्तानी सैन्याच्या हेलिकॉप्टर्सनां लक्ष्य करण्यासाठी तोफांचा वापर करत आहेत. ओलीस धरलेले सर्व प्रवासी हे मजीद ब्रिगेडच्या ताब्यात आहेत, असेही जीयंद बलूच याने सांगितले.