पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर आपले जुनेच रडगाणे सुरू केले आहे. काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मदत घेण्यास पाकिस्तान तयार असल्याचे शुक्रवारी त्यांनी जाहीर केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पाकिस्तानची भूमिकाखान यांनी सांगितले की, “पाकिस्तान केवळ अमेरिकेचीच नव्हे, तर काश्मीरचा वाद सोडवण्यासाठी आणि या भागातील परिस्थिती स्थिर करण्यासाठी मदत करणाऱ्या कोणत्याही देशाच्या मदतीचे स्वागत करेल.” त्यांनी पुढे म्हटले की, हा वाद दक्षिण आशियातील शांतता आणि सुरक्षेच्या केंद्रस्थानी आहे.
भारताची भूमिका स्पष्ट: तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी नाकारली!याउलट, भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. भारत कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारणार नाही. १९७२ च्या शिमला करारामध्येही दोन्ही देशांनी हेच निश्चित केले होते. भारताने अनेकदा हे स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानसोबत केवळ पाकव्याप्त काश्मीर (PoK) परत मिळवणे आणि अशांततेच्या मुद्द्यांवरच चर्चा होईल.
मे महिन्यानंतर संपर्क नाही!मे महिन्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या चार दिवसांच्या संघर्षानंतर, दोन्ही देशांमध्ये कोणताही थेट संवाद झालेला नाही. खान यांनी म्हटले की, “या प्रकरणात अमेरिकेच्या स्वारस्याचे पाकिस्तान स्वागत करतो, परंतु भारताला आपला विचार बदलावा लागेल.” सध्या दोन्ही देशांमध्ये नियमित राजनयिक संपर्काशिवाय कोणतीही चर्चा होत नाहीये.
इतर मुद्द्यांवरही प्रतिक्रियापाकिस्तानमधील खैबर-पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या दहशतवादी कारवायांवर बोलताना खान यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधून पसरणाऱ्या दहशतवादाचा मुद्दा अनेकवेळा मांडला गेला आहे. तसेच, त्यांनी खनिजे काढण्यासाठी अमेरिकेसोबत गुप्त करार झाल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या. युक्रेन युद्धात पाकिस्तानी नागरिकांच्या सहभागाचे आरोपही त्यांनी 'निराधार' असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानशी कोणताही औपचारिक संपर्क साधला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.