Pakistan Internal Politics, Khawaja Asif vs Asim Munir: पाकिस्तानातील लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या वाढत्या राजकीय प्रतिष्ठेमुळे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ अस्वस्थ असल्याचे म्हटले जाते आहे. अलिकडेच आसिफ यांनी सरकार आणि तीन बड्या नेत्यांविरुद्ध वादग्रस्त विधाने केली आहेत. आसिफ यांचे लक्ष्य पाकिस्तानचे सरकारी अधिकारी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नॅशनल (PML-N)चे मोठे नेते आहेत. आसिफ यांच्या वर्तणुकीमुळे पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी ख्वाजा आसिफ यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांनी एक नवीन वळण घेतले. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी राष्ट्रीय असेंब्लीतच ख्वाजा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अब्बासी म्हणाले की, सरकारविरुद्ध वक्तव्य करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा देणे चांगले राहिल.
ख्वाजा आसिफ हे PML-Nचे एक वरिष्ठ नेते आहेत. ते जवळजवळ ४० वर्षे सत्तेचे सूत्रधार आहेत. शाहबाज शरीफ यांचे सरकार स्थापन झाल्यावर ख्वाजा यांना संरक्षण विभागाचे प्रमुख बनवण्यात आले होते, परंतु आता ख्वाजा यांना बाजूला ठेवण्यात आले आहे. ख्वाजा यांच्या जागी आता थेट लष्करप्रमुख पंतप्रधानांसोबत कोणत्याही देशाच्या दौऱ्यावर जात आहेत. यामुळे हा कलह वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
ख्वाजा आसिफ यांची विधाने
ख्वाजा आसिफ यांच्या मते, पुरासाठी भ्रष्ट व्यवस्था जबाबदार आहे. पाकिस्तानी कंत्राटदारांनी सरकारच्या संगनमताने डोंगराळ जमिनीवर अतिक्रमण केले आहे. अशा परिस्थितीत पुराचे पाणी कुठे जाईल? ख्वाजा यांनी पुरासाठी भारताला जबाबदार धरणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांवरही टीका केली. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या मते, कोणीतरी अडवल्याने पाणी थांबत नाही. यात भारताची चूक नाही. पाकिस्तानची पायाभूत सुविधा कमकुवत आहे.
ख्वाजा आसिफ यांनीही पाकिस्तानच्या नोकरशाहीबद्दल कठोर टिप्पणी केली होती. पाकिस्तानी अधिकारी येथून पैसे लुटतात आणि पोर्तुगालमध्ये घरे बांधतात असे ते म्हणाले होते. त्यासाठी त्यांनी भ्रष्टाचारी व्यवस्थेला जबाबदार धरले होते. तसेच, एकजा त्यांनी मरियम नवाज यांना कोंडीत पकडले होते. आसिफ यांच्या मते, राज्य सरकारे काम करू शकत नाहीत . आसिफ पंजाबमधील पुराबद्दल विधान करत होते. इतकेच नाही तर एका मुलाखतीत आसिफ यांनी पूर हा अल्लाहचे वरदान असल्याचे म्हटले होते. आसिफने लोकांना पुराचे पाणी बादलीत ठेवण्यास सांगितले होते. ते साठवून ठेवा. पाणी आता उपलब्ध आहे, नंतर मिळणार नाही, असेही खोचकपणे सांगितले होते.