इस्लामाबाद/नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी असलेला सिंधू जलवाटप करार निलंबित करण्याची घोषणा केली. पाकिस्तानातील सिंचनासह शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हा जलस्रोतच थांबणार असल्याने पाकिस्तान भेदरला असून, शुक्रवारी या देशाच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्ट. जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला थेट धमकी दिली.
‘तुम्ही आमचे पाणी बंद कराल तर, आम्ही तुमचे श्वास बंद करू’ अशा शब्दांत या प्रवक्त्याने गरळ ओकली. येथील एका विद्यापीठात आयोजित समारंभात बोलताना चौधरी यांनी ही धमकी दिली. पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने तातडीने पाकिस्तानशी असलेला सिंधू जलवाटप करार स्थगित केला होता. जोवर पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे बंद करीत नाही तोवर हा करार स्थगित राहाणार आहे.
सिंधू जल संकट हा वॉटर बॉम्ब : पाक खासदार
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे खासदार सय्यद अली जफर यांनी सिंधू जल संकटाला ‘वॉटर बॉम्ब’ असे संबोधले आहे. त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, या गंभीर संकटातून बाहेर पडण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत. या जलसंकटावर आपण आताच तोडगा काढला नाही तर पाकिस्तानी नागरिक उपासमारीने मरतील, असे ते म्हणाले.