पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना अखेर ब्रिटनमधून थेट व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. हा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा दिलासा असला तरी, यामागे दडलेला 'बनावट पायलट' घोटाळा आणि त्यामुळे पाकिस्तानच्या विमान वाहतूक क्षेत्रावर आलेला डाग अजूनही लोकांच्या मनात ताजा आहे.
काय होता तो भीषण घोटाळा?
२०२० साली पाकिस्तानचे तत्कालीन हवाई वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान यांनी स्वतःच संसदेत एक धक्कादायक कबुली दिली होती. त्यांच्या मते, पाकिस्तानमधील तब्बल २६२ पायलटचे परवाने बनावट किंवा संशयास्पद होते. म्हणजेच, अनेकांनी परीक्षा दिलीच नव्हती किंवा योग्य ट्रेनिंग पूर्ण केली नव्हती, तरीही त्यांना प्रवासी विमानं उडवण्याची परवानगी मिळाली होती. ही बातमी जगभर पसरल्यावर, विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
पाकिस्तानला बसलेले जागतिक धक्के!
या खुलाशानंतर, जागतिक पातळीवर पाकिस्तानला मोठे धक्के बसले होते. यूकेने पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना आपल्या 'एअर सेफ्टी लिस्ट' मधून बाहेर काढले होते. युरोपियन यूनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने तर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (PIA) वर थेट बंदीच घातली. अमेरिकेने पाकिस्तानची एविएशन सुरक्षा 'कॅटेगरी-१' वरून 'कॅटेगरी-२' वर खाली आणली होती. ICAO या जागतिक संस्थेनेही पाकिस्तानवर 'Significant Safety Concern' (मोठी सुरक्षा चिंता) असा गंभीर शिक्का मारला.
या बंदीमुळे पाकिस्तानला केवळ आर्थिक नुकसानच सोसावं लागलं नाही, तर त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमाही खूप खराब झाली.
अखेर परवानगी का मिळाली?
गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानने आपल्या विमान वाहतूक सुरक्षा प्रणालीमध्ये सुधारणा केल्याचा दावा केला आहे. त्यांनी पायलट लायसन्स पडताळणीची प्रक्रिया अधिक कठोर केली असून, आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत असल्याचंही सांगितलं. अनेक फेऱ्यांच्या कठोर तपासणीनंतर आणि पाकिस्तानने दाखवलेल्या काही सुधारणांमुळे, आता ब्रिटनने ही बंदी उठवली आहे. ब्रिटनमध्ये सुमारे १७ लाख पाकिस्तानी वंशाचे लोक राहतात, त्यामुळे थेट विमानसेवा बंद झाल्याने त्यांना मोठा त्रास होत होता. या निर्णयामुळे आता त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
विश्वास कधी परत येणार?
जरी विमान उड्डाणांना परवानगी मिळाली असली तरी, तज्ज्ञांच्या मते, कागदावरील सुधारणा आणि प्रत्यक्ष व्यवहारात त्यांची अंमलबजावणी यात फरक असतो. भारतासारख्या देशांचे एविएशन क्षेत्र नेहमीच जागतिक स्तरावर विश्वासार्ह राहिले आहे, तर पाकिस्तानला अजूनही आपल्या सुरक्षा मानकांवर पूर्ण विश्वास मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. 'बनावट पायलट'चा डाग त्यांच्या प्रतिमेवर अजूनही आहे आणि तो पूर्णपणे पुसण्यासाठी पाकिस्तानला अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. केवळ परवानगी मिळाल्याने लोकांच्या मनातील भीती आणि अविश्वास पूर्णपणे दूर होणार नाही.