Pakistan Bus Accident: पाकिस्तानमध्ये रविवारी बस दरीत पडल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे. जखमींमध्ये फिलीपिन्समधील एका महिलेचा समावेश आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात पडली आणि उलटली, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हा अपघात झाला. इस्लामाबादहून लाहोरला जाणारी बस पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यातील बालकासरजवळ दरीत पडली. यावेळी बसमध्ये ४० प्रवासी होते. बसचा टायर फुटल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला.
८ जण जागीच ठार, एकाचा रुग्णालयात मृत्यू
चकवाल जिल्हा आरोग्य प्राधिकरणाचे (DHA) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सईद अख्तर यांच्या मते, या अपघातात ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्व लोकांना चकवाल येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चकवालच्या उपायुक्त सारा हयात आणि सहाय्यक आयुक्त झीशान शरीफ यांनी जिल्हा आरोग्य मुख्यालय (DHQ) रुग्णालयात पोहोचून जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी DC हयात यांनी जखमींना सर्व शक्य वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश दिले.
मृतांमध्ये ४ मुलांचाही समावेश
घटनेची माहिती मिळताच, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि दरीत पडलेल्या लोकांना बाहेर काढले. मृतांमध्ये चार मुलेही असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यापैकी एक बाळ अवघ्या आठ महिन्यांचे आणि दुसरे एक वर्षाचे होते. यासोबतच १४ वर्षे आणि २ वर्षे वय असलेल्या दोन बहिणींचाही मृतांमध्ये समावेश आहे, तर त्यांची आई जखमी आहे. तर परदेशी महिलेचे नाव एमी डेला क्रूझ असून ती फिलीपिन्सची आहे. तिचे लाहोरमध्ये लग्न झाले होते. १२ जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रावळपिंडी येथील रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.