कराची - पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारत या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर हल्ला करू शकते असा दावा पाक मंत्री करत आहेत. त्यात पाकिस्तानने भारताची धास्ती घेतल्याचं दिसून येते. भारत कधीही पाकवर हल्ला करू शकते या पार्श्वभूमीवर LOC पासून कित्येक किमी दूर असलेल्या पाकच्या खैबर पख्तूनख्वा भागात सरकारने २९ जिल्ह्यात सायरन प्रणाली लावण्याचे आदेश दिलेत. ज्यात पेशावर, एबटाबाद यांचाही समावेश आहे.
खैबर पख्तूनख्वा सरकारच्या नागरिक सुरक्षा विभागाकडून सर्व आयुक्त, संरक्षण अधिकारी यांना निर्देश देत आपत्कालीन इशारा देण्यासाठी तातडीने सॉयरन लावण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार, पेशावर, एबटाबाद, मर्दान, कोहाट, स्वात, डेरा इस्माइल खान आणि बन्नूसारख्या मोठ्या शहरात ४-४ सायरन लावले जात आहेत. त्याशिवाय इतर २२ जिल्ह्यात एक सायरन लावला जात आहे. ज्यात लोअर दीर, चितराल, कुर्रम, नौशेरा, हरिपूर, बाजौर, हंगू, वज्रिरिस्तान, ओरकजई या भागाचा समावेश आहे.
LOC पासून खूप अंतर
विशेष म्हणजे हे सर्व जिल्हे LOC पासून खूप अंतरावर आहेत. काही जिल्हे तर ३०० ते ५०० किमी दूर आहेत तरीही तिथे सायरन लावले जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानला ही भीती कायम आहे की पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सैन्य कारवाई करू शकते.
दरम्यान, पाकिस्तानच्या बाजौर परिसरात एअर सायरन लावण्याचे फोटो समोर आलेत. पाकिस्तान LOC पासून अफगाणिस्तान सीमेवर असलेल्या परिसरातही सायरन लावत आहे. भारत काश्मीरमधून नव्हे तर अफगाणिस्तानच्या दिशेने पाकिस्तानवर हल्ला करू शकते अशीही शक्यता पाकिस्तानला वाटते. पाकिस्तानी सैन्याकडून सराव सुरू असून लष्करप्रमुख मुनीर जवानांना धीर देताना दिसत आहेत.