जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरातील नागरिकांसह जगभरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र न्यूयॉर्क टाइम्स हे अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र या हल्ल्याबाबत दिलेल्या वृत्तामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सने पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा उल्लेख केवळ अतिरेकी आणि बंदूकधारी असा केला आहे. त्यावरून आता संताप व्यक्त होत आहे. तसेच अमेरिकन सरकारनेही सोशल मीडियावरून स्पष्टीकरण देत न्यूयॉर्क टाइम्सला झापलं आहे.
अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र विषयक समितीने पहलगाम येथे हल्ला करणाऱ्यांसाठी दहशतवादी शब्दाऐवजी अतिरेकी आणि बंदूकधारी शब्द वापरून या घटनेचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप न्यूयॉर्क टाइम्सवर केला आहे. या समितीने या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचं वर्णन करण्यासाठी न्यूयॉर्क टाइम्सकडून वापरण्यात आलेल्या शब्दांचा निषेध केला आहे. या समितीने यासंदर्भातील वृत्ताचं कात्रण शेअर केलं आहे. त्याचं शीर्षक ‘काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २४ पर्यटकांना मारलं’ असं होतं. समितीने या वृत्तामधील अतिरेकी हा शब्द हटवून त्याच्या जागी दहशतवादी असा शब्द लिहिला.
या समितीने सांगितले की, न्यूयॉर्क टाइम्स तुम्ही दिलेल्या वृत्ताचं शीर्षक आम्ही दुरुस्त केलं आहे. स्पष्टपणे सांगायचं तर हा दहशतवादी हल्ला होता. भारत असो वा इस्राइल, कधीही दहशतवादाचा विषय येतो, तेव्हा न्यूयॉर्क टाइम्स वास्तवापासून दूर राहतो, असा आरोपही या समितीने केला.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले होते. तसेच या दु:खाच्या प्रसंगी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते. तसेच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेंस यांनीही या हल्ल्याचा निषेध करत अमेरिका दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये भारतासोबत असल्याचे सांगितले होते.