पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतातच नाही तर जगातही संताप व्यक्त होत आहे. धर्म विचारून, खतना केलाय का हे कपडे उतरवून पाहिले गेले आणि पर्यटकांना गोळ्या झाडण्यात आल्या. यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवाद्यांनी विचारही केला नसेल अशी कारवाई केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. या काळात अमेरिकेच्या पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याने इस्रायलसारखा बदला घ्यावा, आता कोणताही मार्ग उरलेला नाही, असे म्हटले आहे.
पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी या हल्ल्याला पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या काही दिवसांपूर्वीच्या भाषणाला जबाबदार धरले आहे. असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी भारताविरोधात गरळ ओकली होती. काश्मीर आमची गळ्याची नस होती. ती नसच राहणार आहे. आम्ही हे विसरणार नाही. आमच्या काश्मीरी भावांना त्यांच्या संघर्षकाळात सोडणार नाही, असे मुनीर यांनी म्हटले होते. यावर रुबिन यांनी म्हटले की, आता या हल्ल्यानंतर स्पष्ट आहे, भारताला पाकिस्तानचा गळा कापण्याची गरज आहे. यामध्ये कोणताही किंतू-परंतू असता नये.
पाकिस्तान हे लष्कर-ए-तैयबासह अनेक दहशतवादी संघटनांचे माहेरघर आहे, हे आम्हाला माहिती आहे. दुर्दैवाने पाकिस्तानी राजदूतांनी पाश्चिमात्य देशांना मूर्ख बनविले, यामुळे दहशतवादविरोधी कारवाईचा अभाव होता. बांगलादेशमध्येही आता ही समस्या पसरत आहे. तार्किक आणि वैचारिकदृष्ट्या पाहिले तर पाकिस्तानची आयएसआय यामागे आहे, तसेच एकमेव देश ज्यावर सध्या या हल्ल्याचा दाट संशय आहे, असे रुबिन यांनी मत मांडले.
कालचा दहशतवादी हल्ला हा ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यासारखेच आहे. तो हल्ला विशेषतः ज्यूंवर होता. आता मध्यमवर्गीय हिंदूंना लक्ष्य करून, पाकिस्तानीही तीच रणनीती अवलंबत आहे. अशा परिस्थितीत इस्रायलने हमाससोबत जे केले तेच पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या आयएसआयसोबत करणे गरजेचे आहे. आयएसआयच्या नेतृत्वाला संपवून त्यांना दहशतवादी गट म्हणून घोषित करण्याची आणि भारताचा मित्र असलेल्या प्रत्येक देशाने असे करण्याची अशी मागणी करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.