पाकिस्तानने पुन्हा एकदा रहीम यार खान हवाई तळासाठी NOTAM (Notice to Airmen) जारी केले आहे. भारतीय हवाई दलाने मे २०२५ मध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हा हवाई तळ उद्ध्वस्त झाला होता. या हवाई हल्ल्यानंतरही या धावपट्टीची अद्याप पूर्णपणे दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे हा हवाई तळ १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात रहीम यार खान हवाई तळाच्या धावपट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची दुरुस्ती अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानने जारी केलेले NOTAM हेच दर्शवते की, हा हवाई तळ अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेला नाही. याआधी, १८ जुलै रोजी पाकिस्तान सरकारने याबाबत NOTAM जारी केले होते.
रहीम यार खान हवाई तळ नेमका कुठे आहे?
रहीम यार खान हा हवाई तळ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान शहरात आहे. संरक्षण आणि सामरिकदृष्ट्या हे ठिकाण खूप महत्त्वाचे मानले जाते. फ्लाइटराडार२४ नुसार, या हवाई तळावर एकमेव धावपट्टी आहे, जी ३,००० मीटर (९,८४३ फूट) लांबीची आहे. पाकिस्तानचे हवाई दल आपले बहुतांश उड्डाण या ठिकाणाहून चालवते.
हा हवाई तळ भारतीय सीमेजवळ असल्यामुळे तो महत्त्वाचा आहे. तसेच, हे ठिकाण लष्करी आणि नागरी दोन्ही कामांसाठी वापरले जाते. इथे शेख जायद आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये झाला होता हल्ला
भारतीय हवाई दलाने १० मे २०२५ रोजी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत या महत्त्वाच्या हवाई तळाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात भारताने डीआरडीओच्या स्मार्ट अँटी-एअरफील्ड वेपनचा वापर केला होता. त्यामुळे धावपट्टीचे मोठे नुकसान झाले आणि ती वापरण्यायोग्य राहिली नाही.
या ताज्या NOTAM मुळे हे स्पष्ट झाले आहे की, पाकिस्तानला अजूनही या हवाई हल्ल्यातून सावरता आलेले नाही. रहीम यार खानसारख्या महत्त्वाच्या हवाई तळाला पुन्हा सुरू करण्यासाठी पाकिस्तानला अजून तीन महिन्यांहून अधिक वेळ लागेल, अशी शक्यता आहे.