नॉर्थ मॅसेडोनियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोकानी येथील पल्स नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली. यामध्ये ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. नॉर्थ मॅसेडोनियाच्या सरकारी न्यूज एजन्सीने गृह मंत्रालयाचा हवाला देत ही माहिती दिली आहे.
नॉर्थ मॅसेडोनियाची राजधानी स्कोप्जेपासून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरात रविवारी पहाटे आग लागली. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये नाईट क्लबमध्ये मोठी आग लागल्याचं आणि आकाशात दाट धुराचे लोट दिसत आहेत. या घटनेत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप मृतांच्या संख्येची पुष्टी केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, २ वाजता आग लागली. त्यावेळी नाईट क्लबमध्ये नॉर्थ मॅसेडोनियाच्या प्रसिद्ध हिप-हॉप जोडी एडीएनचा लाईव्ह शो चालू होता. या कॉन्सर्टला सुमारे १५०० लोक उपस्थित होते. घटनेनंतरही काही तासांनी नाईट क्लबमधील आग आटोक्यात आणता आली नसल्याचं सांगण्यात येत आहे.