Nobel Prize: नोबेल पुरस्कारांच्या घोषणेला सुरुवात! स्वीडनच्या स्वांते पाबो वैद्यकशास्त्रातील पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 05:06 PM2022-10-03T17:06:54+5:302022-10-03T17:07:14+5:30
पाबो यांनी आधुनिक मानवाच्या 'जीनोम्स' आणि आपल्या जवळच्या काळात धोक्यात आलेल्या प्रजाती, निएंडरथल्स आणि डेनिसोव्हन्स यांची तुलना करणाऱ्या संशोधनाचे नेतृत्व केले.
स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. 'मानवांची उत्क्रांती' या विषयावरील शोधासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी सोमवारी स्वीडनमधील स्टॉकहोम येथील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये विजेत्याची घोषणा केली.
पाबो यांनी आधुनिक मानवाच्या 'जीनोम्स' आणि आपल्या जवळच्या काळात धोक्यात आलेल्या प्रजाती, निएंडरथल्स आणि डेनिसोव्हन्स यांची तुलना करणाऱ्या संशोधनाचे नेतृत्व केले. या संशोधनाद्वारे या प्रजातींमध्ये मिश्रण असल्याचे समोर आले आहे. वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकांसह नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. आता मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर होणार आहेत.
यंदाच्या शांततेच्या नोबेल पारितोषिकाची घोषणा शुक्रवारी होणार असून अर्थशास्त्र क्षेत्रातील पुरस्काराची घोषणा 10 ऑक्टोबरला होणार आहे. मानवी शरीर तापमान आणि स्पर्श कसे ओळखतो, यावर गेल्या वर्षी संशोधन झाले होते. त्याचा शोध डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पटपुटियन यांनी लावला होता. या दोघांना गेल्या वर्षीची नोबेल पुरस्कार दिला गेला होता.
मृत्यूपत्रातून मिळते पुरस्काराची रक्कम...
पुरस्कारामध्ये एक कोटी स्वीडिश क्रोनर (अंदाजे रु. 7.31 कोटी) रोख रक्कम असेल, ती 10 डिसेंबर रोजी विजेत्यांना दिली जाईल. ही रक्कम स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या संपत्तीतून मृत्युपत्राद्वारे दिली जाते. त्यांनी या पुरस्काराची स्थापना केली होती. अल्फ्रेड नोबेल यांचे 1895 मध्ये निधन झाले.