जॉइंट बेस एल्मेंडॉर्फ-रिचर्डसन, अलास्का: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत शुक्रवारी अलास्का येथील शिखर परिषदेत युक्रेनचे युद्ध संपविण्यासाठी कोणताही करार झाला नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, पुतिन यांनी संकेत दिले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युक्रेनबाबत एक समझोता झाला आहे.
शिखर परिषदेनंतर ट्रम्प म्हणाले की, एखाद्या विषयावर करार होत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट निश्वित मानू नये. पुतिन यांच्यासोबत काही मुद्यांवर सहमती झाली तर काही मुद्यांवरील चर्चा अपूर्ण राहिली. पुतीन यांची पत्रकारांसमोर टाळाटाळ बैठकीसाठी पुतिन आणि ट्रम्प एकत्र गाडीत बसून रवाना होण्याच्या तयारीत असताना तिथे असलेल्या पत्रकारांनी पुतिन यांना विचारले की, तुम्ही निष्पाप लोकांची हत्या थांबवणार का? त्यावर पुतीन यांनी हात कानावर नेल्यासारखे करून बहिरेपणाचा अभिनय केला.
दोन्ही देशांतील तीन नेत्यांमध्ये परिषद
युक्रेनचा नाटो प्रवेश रोखणे व त्यावर पुन्हा रशियाच्या नियंत्रणासाठीचा प्रयत्न म्हणूनही पुतिन यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्याचे ठरविले, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे दोघेच एकांतात चर्चा करतील असे ठरविण्यात आले होते. मात्र, नंतर दोन्ही देशांतील तीन-तीन नेत्यांमध्ये ही बैठक झाली. ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि स्टीव्ह विटकॉफ, तर पुतीन यांच्यासोबत सर्गेई लाव्हरोव आणि युरी उशाकोव्ह सहभागी झाले.