येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भारतातील ग्रँड मुफ्ती कंठापुरम एपी अबूबकर मुसलियार यांच्या कार्यालयाने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा, जी पूर्वी स्थगित करण्यात आली होती, ती आता पूर्णपणे रद्द करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. मात्र यासंदर्भात भारत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ग्रँड मुफ्ती यांच्या कार्यालयाने म्हटलं आहे की, येमेनची राजधानी सना येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१८ पासून निमिषा प्रिया या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा रंगली आहे. निमिषावर तिच्या बिझनेस पार्टनरची हत्या करून नंतर मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. मार्च २०१८ मध्ये तिला हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आणि २०२० मध्ये येमेन न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली.
केरळमधील ३४ वर्षीय नर्स निमिषा प्रिया ही मूळची पलक्कड जिल्ह्यातील आहे. निमिषा २००८ मध्ये नोकरीच्या शोधात येमेनला गेली होती. ती एका ख्रिश्चन कुटुंबातील आहे. येमेनची राजधानी सना येथे तिची भेट स्थानिक नागरिक तलाल अब्दो महदीशी झाली, ज्याच्यासोबत तिने पार्टनरशिपमध्ये एक क्लिनिक सुरू केले. काही काळानंतर त्यांचे संबंध बिघडले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महदीने निमिषाला त्रास देण्यास सुरुवात केली आणि सार्वजनिक ठिकाणी स्वतःला तिचा पती असल्याचं सांगू लागला. एवढंच नाही तर त्याने निमिषाचा पासपोर्टही जप्त केला जेणेकरून ती भारतात परत येऊ नये. येमेन अधिकाऱ्यांच्या मते, २०१७ मध्ये निमिषाने तिचा पासपोर्ट परत मिळवण्यासाठी महदीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा प्रयत्न जीवघेणा ठरला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.
२०१८ मध्ये निमिषाला हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आणि २०२० मध्ये न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलं. मानवाधिकार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तिच्या शिक्षेविरुद्ध मोहीम सुरू केली. भारताचे ग्रँड मुफ्ती कंठापुरम एपी अबूबकर मुसलियार यांनीही या प्रकरणी पुढाकार घेतला होता. ग्रँड मुफ्तींच्या विनंतीनंतर येमेनमध्ये या प्रकरणावर विचारविनिमय सुरू झाला. आता येमेनमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर निमिषाची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.