केरळमधील नर्स निमिषा प्रिया येमेनच्या तुरुंगात तलाल अब्दो महदी याच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. यमेनेच्या सरकारने तिला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. १६ जुलै रोजी निमिषाला फाशी होणार होती. पण, भारत सरकार आणि मुस्लिम धर्मगुरूंच्या मध्यस्थीमुळे या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली होती. यावर तलालचे कुटुंब संतप्त झाले आहे. आता निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी, यासाठी आता तलालच्या भावाने तिसऱ्यांदा याचिका दाखल केली आहे.
तलालचा भाऊ अब्दुल फत्ताह महदीने शनिवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. त्याने म्हटले की, 'त्याने यमनच्या डेप्युटी ॲटर्नी जनरलला भेटून निमिषाला दिलेल्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.'
काय आहे प्रकरण?
या पोस्ट सोबत फत्ताहने सोशल मीडियावर डेप्युटी ॲटर्नी जनरलला लिहिलेले पत्रही शेअर केले आहे, ज्यावर तललच्या वारसदारांची स्वाक्षरी असल्याचे म्हटले आहे. या पत्रात तललची हत्या येमेनच्या इतिहासातील एक वाईट घटना असल्याचे म्हटले आहे आणि निमिषा प्रियाला तातडीने फाशी देण्याची मागणी केली आहे. निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा देण्याची तारीख आधी १६ जुलै ठरवण्यात आली होती, परंतु नंतर राजनयिक आणि धार्मिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे ती स्थगित करण्यात आली.
निमिषाला फाशीची शिक्षा होणार?केरळच्या पलक्काड जिल्ह्यातील कोल्लेंगोडे येथील रहिवासी असलेली ३८ वर्षीय नर्स निमिषा प्रिया हिला जुलै २०१७ मध्ये यमनच्या एका नागरिकाची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. निमिषाने तिचा पासपोर्ट परत मिळवण्यासाठी महदीला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले होते, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये, येमेनच्या कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली आणि नोव्हेंबर २०२३मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने तिचे अपील फेटाळले. ती सध्या येमेनची राजधानी सना येथील तुरुंगात कैद आहे, जी इराण-समर्थित हुती बंडखोरांच्या ताब्यात आहे. या प्रकरणात पीडित कुटुंबाने 'ब्लड मनी' घेण्यासही नकार दिला आहे.