अबुजा/मुंबई : गेली अनेक शतके चालू असणाऱ्या फिमेल जेनिटल म्युटिलेशन (एफजीएम) म्हणजेच स्त्री जननांग कापण्याच्या विकृत प्रथेवर अखेर सोमवारी नायजेरियाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रथेमध्ये स्त्रियांच्या जननांगांचा काही भाग कापला जाई किंवा पूर्णपणे छाटला जाई. साधारणत: डझनभर आफ्रिकन देशांमधील ही कुप्रथा रूढ आहे. त्यातही नायजेरिया, इजिप्त आणि इथिओपिया या देशांत त्याचे प्रमाण सर्वाधीक आढळून येत असे.
आफ्रिकेतील अनेक देशांत टोळ््यांमध्ये एफजीएमची प्रथा सुरु होती व आहे. वांशिक भेदांनुसार एफजीएमच्या पद्धतीत बदल होत असे. पुरुषसत्ताक मानसिकतेच्या अतिरेकातून आणि स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे सुख अथवा आनंद घेण्याचा अधिकार मिळू नये अशा विकृत विचारांमधून एफजीएचा उदय झाला होता. स्त्रीत्वाचा नैसर्गिक आधारही हिसकावून घेणे हाच यामागील खरा उद्देश होता. युनिसेफच्या माहितीनुसार १५ ते ४९ या वयोगटामधील १९.९ दशलक्ष नायजेरियन महिलांना एफजीएचा त्रास सहन करावा लागला होता. अखेर द व्हायोलन्स अगेन्स्ट पर्सन्स (प्रोहिबिशन) अॅक्ट २०१५ हा कायदा नायजेरियन सिनेटने मंजूर केला आणि नायजेरियाने एफजीएमविरोधात ठाम पाऊल उचलल्याचे सर्व जगाला दाखवून दिले. नायजेरियात नुकतेच सत्तांतर झाले. मावळते राष्ट्रपती गुडलक जोनाथन यांनी आपल्या कारकिर्दीतील शेवटचे काम म्हणजे एफजीएमवर बंदी घालून नवनिर्वाचित राष्ट्रपती मुहम्मुदु बुहारी यांच्याकडे सत्ता सोपविली आहे. नायजेरियाच्या या कृतीचे जगभरातून कौतुक होत असून शोषित आफ्रिकन महिलांसाठी हा आशेचा नवा किरण ठरू पाहात आहे. इजिप्तने सात वर्षांपूर्वी एफजीएमवर बंदी घातली आहे. आता नायजेरियाने बंदी घातल्यावर लायबेरिया, सुदान, मालीसुद्धा असे पाऊल उचलतील अशी अपेक्षा आहे.एफजीएम काय आहे?एफजीएम ही महिलांची सुंता आहे. स्त्रियांच्या जननांगातील योगीलिंग (मदनध्वज), तसेच बाह्य त्वचेची आवरणे चक्क कापून टाकली जात. बऱ्याचवेळेस केवळ मूत्रविसर्जनासाठी मार्ग ठेवून त्यांच्यावर अत्याचारच केले जात. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असेच शिवाय अनेक रोगांची व संसर्गाची लागण महिलांना होत असे. प्रसुतीमार्गात अडथळे आल्याने महिलांना नरकयातना भोगाव्या लागत. मूत्रमार्गात संसर्ग झाल्याने हजारो महिलांना वेदना अंगावर वागवतच जीवन जगावे लागले. सर्वात दुर्देवी म्हणजे हे करताना निर्जंतुकीकरणाची कसलीही काळजी न घेतलेल्या ब्लेड कात्री यासारख्या धारधार साधनांनी हा अत्याचार केला जातो.--------------बंधनात ठेवण्यासाठीच एफजीएमचा वापरलैंगिकतेचा आविष्कार हा एका अर्थाने सुखाचा नैसर्गिक आविष्कार असतो, त्यामुळे स्त्रीला कोणतेही सुख मिळूच नये यासाठी एफजीएमचा अक्षरश: हत्यार म्हणून वापर झाला. तिच्या लेैंगिकतेवरही बंधन आणले गेले. या प्रथेला धर्माचाही आधार देण्यात आला. पण एफजीएममुळे लाखो स्त्रियांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. आता नायजेरियाने त्यावर बंदी घातली आहे, त्यांचे स्वागत करू - वंदना खरे, लेखिका,नाटककार, ‘व्हजायना मोनोलॉग’च्या अनुवादक