लंडन: जगात सर्वत्र कोरोनानं थैमान घातलंय. आतापर्यंत शंभरहून अधिक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असून जवळपास ५ हजार जणांचा मृत्यू झालाय. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या सव्वा लाखांपेक्षा जास्त असल्यानं जगभरात चिंतेचं वातावरण आहे. त्यातच लंडनमधून एक आणखी चिंताजनक बातमी आलीय. एका नवजात बाळाला कोरोनाची लागण झालीय. हा कोरोनाचा जगातला सर्वात कमी वयाचा रुग्ण ठरला आहे. नवजात बाळाच्या जन्माआधी आईमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यामुळे ती महिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाली. तिचा कोरोना चाचणीचा अहवाल बाळाच्या जन्मानंतर आला. सध्या बाळावर आणि आईवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आईची प्रकृती बाळापेक्षा गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. महिलेला उपचारांसाठी विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बाळावर नॉर्थ मिडलसेक्समधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आईला कोरोनाची बाधा झाल्याचं लक्षात येताच डॉक्टरांनी बाळावर तातडीनं उपचार सुरू केले. बाळाला कोरोनाचा संपर्क नाळेच्या माध्यमातून झाला की प्रसूती होत असताना त्याला कोरोनाची बाधा झाली, याचा शोध घेण्याचा प्रयत्नदेखील डॉक्टरांकडून सुरू आहे. बाळ आणि आईच्या थेट संपर्कात आलेल्या रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना इतरांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आई आणि बाळाला झालेल्या संसर्गाचे परिणाम शोधण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. महिला आणि नवजात बाळांना कोरोनाचा फारसा धोका नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र आता आई आणि बाळाला कोरोना झाल्यानं डॉक्टरांनी त्यांच्या शारीरिक स्थितीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून एकाच दिवशी २०० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ८०० वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus: नवजात बाळाला कोरोनाची लागण; जगातील सर्वात कमी वयाचा कोरोनाग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 11:23 IST
आई आणि बाळावर उपचार सुरू; आईची प्रकृती बाळापेक्षा गंभीर
Coronavirus: नवजात बाळाला कोरोनाची लागण; जगातील सर्वात कमी वयाचा कोरोनाग्रस्त
ठळक मुद्देआई आणि बाळावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरूआईची प्रकृती बाळापेक्षा गंभीर; विशेष रुग्णालयात उपचारब्रिटनमध्ये कोरोनाचे ८०० हून अधिक रुग्ण; आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू