काठमांडू - नेपाळमध्ये सत्तांतराचे वारे वाहू लागले आहे. युवकांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता अंतरिम सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने एक नाव समोर आले ते म्हणजे बालेन शाह...नेपाळच्या राजकारणात वेगाने लोकप्रिय झालेले काठमांडूचे महापौर बालेन शाह चर्चेत आले आहेत. प्रसिद्ध रॅपर आणि इंजिनिअर म्हणून पुढे आलेले बालेन शाह यशस्वी राजकारणी म्हणून उभे राहिले आहेत. राजकारणात येण्यापूर्वीच तरुणांमध्ये त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. सध्या त्यांच्या एकूण संपत्तीची आणि कमाईबाबत चर्चा सुरू झाली आहे.
रिपोर्टनुसार, बालेन शाह यांची एकूण संपत्ती जवळपास ५-६ कोटी नेपाळी रूपयात आहे. त्यांचे मासिक उत्पन्न ३ लाखाहून अधिक आहे. राजकीय करिअरबाबत बोलायचे झाले तर बालेन शाह सध्या काठमांडू महापालिकेत महापौर आहेत. मेयरपदी असताना त्यांना महिन्याला ४६ हजार रूपये वेतन मिळते. त्यांची अतिरिक्त कमाई इंजिनिअर व्यवसाय आणि रॅपर म्हणून होते. बालेन शाह यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इंजिनिअर म्हणून बालेन कन्सल्टिंग अँन्ड कन्ट्रक्शन संचालक म्हणून येते. त्याशिवाय पदमा ग्रुप ऑफ कंपनीजमध्येही ते डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम करतात.
त्याशिवाय बालेन शाह हे प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार आहेत. त्यांचे अनेक टीव्ही शो, रॅप आणि म्युझिक व्हिडिओ समोर आलेत. युवकांमध्ये त्यांची क्रेझ अधिक आहे, यातूनही त्यांची चांगली कमाई होते. रॅप, गीतकार, संगीत, स्टेज परफॉर्मेंस यातून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूबमधूनही बालेन शाह कमावतात. बालेन शाह यांची जीवनशैली चर्चेत असते. त्यांच्याकडे लग्झरी वाहने आहेत. ज्यात सुझूकीसारख्या मॉडेलचा समावेश आहे.
दरम्यान, २०२३ साली बालेन शाह यांचा टाईम मॅग्जिनच्या १०० प्रतिष्ठित लोकांच्या यादीत समावेश झाला होता. बालेन शाह यांचे पूर्ण नाव बालेंद्र शाह असं आहे. त्यांचा जन्म २७ एप्रिल १९९० साली काठमांडू येथे झाला होता. बालेन यांनी मास्टर्स कर्नाटकच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून केले होते. महापौर म्हणून बालेन शाह यांनी कचऱ्याचे नियोजन, पारदर्शी शासन, शहराचा विकास आराखडा, डिजिटल प्रशासन, युवकांचे संरक्षण यावर काम केले त्यामुळे आज त्यांच्या मागे युवकांची मोठी फौज आहे आणि त्यांना सत्ता सोपवण्याची मागणी करत आहेत.