नेपाळ सध्या मोठ्या राजकीय उलथापालथीतून मार्गक्रमण करताना दिसत आहे. राजधानी काठमांडूमध्ये जेन-झेड रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध तीव्र निदर्शने करत आहेत. संपूर्ण नेपाळमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. एक दिवस आधी संसद भवनावर झालेल्या हल्ल्यानंतर, संतप्त तरुणांनी पंतप्रधान केपी ओली यांच्या निवासस्थानावरही हल्ला केला. यानंतर पंतप्रधान ओली यांना राजीनामा देणे भाग पाडले. यातच ते देश सोडून गेल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, आता नेपाळच्या सामाजिक आणि धार्मिक संरचनेसंदर्भातही चर्चा होताना दिसत आहे. प्रामुख्याने, नेपाळमध्ये किती हिंदू आहेत? किती मुस्लीम आहेत? त्यांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती कशी आहे, यासंदर्भात चर्चा होताना दिसत आहे. तर जाणून घेऊया, नेपाळमधील हिंदू आणि मुस्लीम लोकसंख्येसंदर्भात आणि समाजात त्यांचे स्थान कसे आहे, यासंदर्भात...
नेपाळमध्ये किती हिंदू? किती मुस्लीम? -नेपाळमध्ये २०२१ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार, देशाची एकूण लोकसंख्या सुमारे २.९७ कोटी एवढी आहे. एकूण लोकसंख्येच्या ८१.१९ टक्के हिंदू आहेत, अर्थात हिंदूंची लोकसंख्या सुमारे २ कोटी ३६ लाख एवढी आहे. २०११ च्या तुलनेत हिंदू लोकसंख्येत अल्पशी घट झाली आहे. एकेकाळी नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. मात्र, आता ते धर्मनिरपेक्ष देश बनले आहे.
नेपाळमध्ये लोकसंख्येच्या बाबतीत मुस्लीम हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. २०२१ च्या जनगणनेनुसार, ५.०९ टक्के लोक मुस्लीम आहेत. अर्थात सुमारे १४ लाख ८३ हजार लोक इस्लाम धर्माचे पालन करतात. २०११ मध्ये ही संख्या ४.४ टक्के होती, जी आता ५.०९ टक्के झाली आहे, म्हणजेच ०.६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नेपाळमध्ये बहुतेक सुन्नी मुस्लीम राहतात. ते प्रामुख्याने भारताच्या सीमेला लागून असलेल्या तराई प्रदेशात स्थायिक आहेत. मुस्लीम लोकसंख्येच्या ९५ टक्के लोक येथेच राहतात.
नेपाळमधील इतर धर्मांसंदर्भात थोडक्यात - नेपाल मध्ये बौद्ध धर्म दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. नेपाळ हे बुद्धांचे जन्म स्थान आहे. यामुळे येथे बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव आहे. येथीली 8.2 टक्के लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. यांची लोकसंख्या जवळपास 23 लाख 94 हजार एवढी आहे. याशिवाय, नेपाळमधील मूळ आदिवासी समुदायांमध्ये किरात धर्माचे पालन केले जाते. जनगणनेत त्याचा वाटा ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच, नेपाळमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या फार कमी आहे. मात्र, गेल्या दशकात यात ०.३६ टक्क्यांची वाढ झाली आहे. अर्थात नेपाळ अद्यापही हिंदू बहुल देश आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत येथे धार्मिक विविधता वाढताना दिसत आहे.