जगभरात पुन्हा एकदा एका रहस्यमय आजाराने थैमान घातले आहे. आफ्रिकन देश कांगो येथे या आजाराचा कहर पाहायाल मिळत असून त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागत आहेत. या आजाराने आतापर्यंत अवघ्या २५ दिवसांत ७९ लोकांचा बळी घेतला आहे आणि ३०० हून अधिक लोक आजारी पडले आहेत. त्याला X डिजीज म्हटलं जात आहे. या आजाराचं गांभीर्य लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी लोकांना सावध राहण्यासही सांगण्यात आले आहे. या आजाराची लक्षणं जवळजवळ फ्लूसारखीच असतात. म्हणजेच संक्रमित व्यक्तीला ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की, या आजाराबद्दल काहीही माहिती नाही. या आजाराचे सर्वाधिक बळी टीनेजर्स (१५ ते १८ वर्षे) आहेत.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, दक्षिण-पश्चिम कांगोमध्ये या रहस्यमय आजाराचे पहिले प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर हा आजार झपाट्याने पसरला आणि २५ दिवसांत किमान ७९ जणांचा मृत्यू झाला. या रुग्णांमध्ये फ्लूसारखी लक्षणं दिसून आली. कांगो नागरी समाजाचे नेते सिम्फोरियन मंझांजा यांनी रॉयटर्सला सांगितलं की, संक्रमित लोकांची संख्या सतत वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे.
औषधांच्या पुरवठ्यातही काही समस्या आहे. आरोग्य विभागाची पथकं येथे पाठवण्यात येत आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना शांत आणि सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. लोकांना साबणाने वारंवार हात धुवावे, सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय मृतदेहाला स्पर्श करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.