ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १९ - शिकागोतील अलिशान इमारतीतील सर्वात महागडे घर मुळचे मुंबईकर पण सध्या अमेरिकेत राहणा-या संजय शहा यांनी विकत घेतले आहे. शिकागोतील ट्रम्प टॉवरच्या ८९ व्या मजल्यावरील १५ हजार चौरस फुटाचे अलिशान पेंटहाऊस शहा यांनी तब्बल १७ मिलीयन डॉलर्समध्ये (१ अब्ज रुपये) विकत घेतले असून शिकागोमधील हे सर्वात महागडे घर ठरले आहे.
मुंबईत जन्मलेले ४६ वर्षीय संजय शहा हे १९८८ मध्ये एमबीए करण्यासाठी अमेरिकेत आले. एमबीए झाल्यावर कॅनडातील कंपनीमध्ये त्यांनी काम केले. पण या कामात ते रमले नाही आणि १९९३ मध्ये शिकागोमध्ये स्थलांतर केले. शिकागोत त्यांनी सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली. आता शाह यांच्या कंपनीचा व्यवसाय २०० मिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचला असून सध्या त्यांच्या कंपनीत ४०० हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. त्यांनी तयार केलेले सॉफ्टवेअर्स भारत, जर्मनी, अमेरिका, पॉलंड, सिंगापूर, ब्राझील, कोलंबिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये वापरली जात आहेत.
लुइसियानाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांनी आपण फक्त अमेरिकन असून भारतीय - अमेरिकन होण्यासाठी अमेरिकेत आलेलो नाही असे विधान केले होते. संजय शहा हे मात्र या विधानाशी फारशे सहमत नाही. मी मनाने अजूनही भारतीयच आहे असे ते सांगतात. संजय शहा यांचे आईवडिल मुंबईत १२०० चौरस फुटाच्या घरात राहतात. मी शिकागोतील अलिशान टॉवरमध्ये १५ हजार चौरस फुटाचे घर घेतल्यावर ऐवढ्या मोठ्या घराचे काय करणार असा सवाल माझ्या आईने विचारल्याचे संजय शहा हसत हसत सांगतात. शिकागोतील हे घर माझ्या ऑफीसपासून लांब आहे. त्यामुळे हे घर आमचे सेकंड होम असेल. माझे क्लायंट किंवा पाहूण्यांसाठी या घराचा वापर होईल असे शाह यांनी सांगितले. शहा त्यांची पत्नी आणि दोन मुलींसोबत शिकागोमध्ये राहतात.
घराचे वैशिष्ट्य
१५ हजार चौरस फुटाच्या या अलिशान घरात पाच बेडरुम आणि आठ बाथरुम आहेत. या घराचे वैशिष्ट्य म्हणजे या घराच्या सर्व बाजूंनी शिकागोचा मनमोहक नजारा दिसतो. या घराची किंमत १७ मिलीयन डॉलर्स असली तरी शहा आणखी १३ मिलीयन डॉलर्स खर्च करुन घराचे नुतनीकरण करणार आहेत.