कॅनबेरा : पंतप्रधान टोनी अबोट आणि इतर वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य बनवून संसदेवर मुंबईसारखा अतिरेकी हल्ला करण्याचा इस्लामिक स्टेट अर्थात इसिसच्या दहशतवाद्यांचा कट ऑस्ट्रेलियन गुप्तचर संघटनांनी उघडकीस आणला आहे.
दहशतवाद्यांनी हल्ल्याचा कच रचल्याचे धागेदोरे मिळाल्यानंतर संसदेत सशस्त्र केंद्रीय पोलीस अधिका:यांना तैनात करण्यात आले आहे. संसदेच्या आत व अवतीभवती सशस्त्र केंद्रीय पोलीस सदोदीत तैनात असतील, असे पंतप्रधान अबोट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या महिन्याच्या सुरुवातीला आपणास दहशतवाद्यांत हल्ल्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून आपण सुरक्षेचा तातडीने आढावा घेण्याचे आदेश दिल्यानंतर संसदेच्या सुरक्षेत वाढ करण्याची शिफारस करण्यात आली, असे ते म्हणाले. मी ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या सुरक्षेसाठी चिंतित आहे. हे माङयासाठी नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. गुप्तचरांनी संसदेविषयीची चर्चा पकडली असून मुंबईसारख्या हल्ल्याच्या पूर्वतयारीसाठी संसद भवनाची रेकीही केली गेली असावी, अशी भीती त्यांना सतावत असल्याचे वृत्त डेली टेलिग्राफने दिले आहे.(वृत्तसंस्था)