Asaduddin Owaisi: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. यानंतर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडत आहे. खासदार असदुद्दीने ओवेसी यांचा सहभाग असलेले शिष्टमंडळ कुवेतमध्ये पोहोचले. त्यांनी तिथे भारताची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ओवेसी यांनी पाकिस्तानची लाजच काढली आहे.
कुवेत येथील प्रवासी भारतीयांशी संवाद साधताना ओवेसी यांनी पाकिस्तानवर खरमरीत टीका केली. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना एक फोटो दिला. पाकिस्तानचे राष्ट्रपती तिथे उपस्थित होते आणि राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्षही तिथे होते. हे मूर्ख जोकर लोक भारताशी स्पर्धा करू इच्छितात. त्यांनी २०१९ मधील चिनी लष्कराच्या कारवायांचा फोटो शेअर केला होता आणि तो भारतावरील विजय असल्याचा दावा केला होता.
नक्कल करण्यासाठीही अक्कल लागते
आपण शाळेत जाताना नेहमी एक गोष्ट ऐकत असतो. शाळेत असताना अनेकदा असे होते की, चांगला अभ्यास करणाऱ्या मुलाच्या शेजारी जाऊन मुले बसतात. पण नक्कल करण्यासाठीही अक्कल लागते. या नालायक लोकांना तर मेंदूच नाही. तुम्ही स्वतः कल्पना करू शकता की, तुमच्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष तिथे उपस्थित आहेत. तुमचा तथाकथित फील्ड मार्शल तिथे होते. ते चीनचा फोटो देत आहे. पाकिस्तान काहीही म्हणत असला तरी चिमूटभर मीठाएढवही त्यांना किंमत देऊ नका, अशी बोचरी टीका ओवेसी यांनी केली.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून भारताला कोणत्या धोक्याचा सामना करावा लागत आहे, हे जगाला कळावे म्हणून सरकारने आम्हाला इथे पाठवले आहे. आपण अनेक निष्पाप लोकांचे प्राण गमावले आहेत. या सर्व समस्या फक्त पाकिस्तानमुळेच उद्भवलेल्या आहेत, या शब्दांत ओवेसी यांनी हल्लाबोल केला.