इस्रायलने सीरियामधून प्रसिद्ध गुप्तहेर एली कोहेनशी संबंधित हजारो वस्तू जप्त केल्या आहेत. रविवारी, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सीरियन आर्काइव्हमधून एली कोहेन याच्या मालकीच्या २,५०० वस्तूंपैकी काही वस्तू कोहेन यांच्या पत्नीसोबत शेअर केल्या. इस्रायलने एका गुप्त कारवाईद्वारे एली कोहेनच्या या वस्तू सीरियाहून आणण्यात यश मिळवले आहे. एलीने ६० च्या दशकात सीरियामधून महत्त्वाची माहिती गोळा करून इस्रायली सैन्याला मदत केली होती.
एलीला सीरियामध्ये अटक करण्यात आली आणि त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सीरियाची राजधानी दमास्कसमधील एका चौकात कोहेनला फाशी देण्यात आली होती. याला रविवारी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी, नेतन्याहू यांनी कोहेनची आठवण काढली आणि त्यांना इस्रायलचा हिरो म्हटले आहे.
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
इस्रायलला सीरियातून कोहेनशी संबंधित वस्तू परत आणण्यात यश आले आहे. यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे, रेकॉर्डिंग्ज, त्यांनी लिहिलेली पत्रे, सीरियातील मोहिमेचे फोटो आणि अटकेनंतर त्यांच्या घरातून जप्त केलेल्या वस्तूंचा समावेश आहे. इस्रायलला आणलेल्या सुटकेसमध्ये हस्तलिखित नोट्सने भरलेले फोल्डर, कोहेनच्या दमास्कसमधील अपार्टमेंटच्या चाव्या, बनावट पासपोर्ट यांचा समावेश आहे.
एली इस्राएलमध्ये हिरो
इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादची जागतिक ओळख प्रस्थापित करण्यात कोहेनची सर्वात मोठी भूमिका असल्याचे मानले जाते. कोहेनचे सीरियातील मिशन हे मोसादचे जागतिक स्तरावरील पहिले मोठे यश होते. १९६७ च्या सीरियाविरुद्धच्या युद्धात इस्रायलला जिंकण्यास मदत करण्याचे श्रेय कोहेनच्या हेरगिरीला जाते. या युद्धाने अरब जगात इस्रायलचे वर्चस्व प्रस्थापित केले. २०१९ मध्ये, एली कोहेनच्या जीवनावर आधारित 'द स्पाय' नावाची सिरीज बनवण्यात आली आहे.
एली कोहेन यांचा जन्म १९२४ मध्ये इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे एका सीरियन-ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे वडील १९१४ मध्ये सीरियातील अलेप्पो येथून येथे स्थायिक झाले. १९४९ मध्ये कोहेनचे कुटुंब इस्रायलमध्ये स्थायिक झाले, पण कोहेन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी काही काळ इजिप्तमध्ये राहिले. ज्यावेळी कोहेन इस्रायलला परतले त्यावेळी त्यांचे इंग्रजी, अरबी आणि फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व आणि त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने इस्रायली गुप्तचरांचे लक्ष वेधून घेतले.