वॉशिंग्टन - भारत आणि अमेरिका भागीदारीतून जनतेचं हित साधलं जाईल. ट्रम्प आम्हाला मेक अमेरिका ग्रेट अगेनची आठवण करून देतात तसेच २०४७ पर्यंत भारत एक विकसित देश बनणं हे १४० कोटी भारतीयांचा संकल्प आहे. आमच्या एकत्र येण्याचा अर्थ 'एक और एक ग्यारह' आहे. मी भारतीयांकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं दुसऱ्यांदा सत्तेत आल्याबद्दल अभिनंदन करतो असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मागील वर्षी मला तिसऱ्यांदा सत्ता सोपवून जनतेची सेवा करण्याची संधी दिली. ट्रम्प यांना दुसऱ्यांदा जनतेच्या सेवेची संधी मिळाली. आम्ही समान ऊर्जा आणि उत्साहासह एकत्र काम करू. ट्रम्प यांच्या पूर्वीच्या ४ वर्षाचा अनुभव पाहता त्याच उत्साहाने आम्ही पुढे वाटचाल करू. अमेरिकेत हाऊडी मोदी आणि भारतात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाची मला आजही आठवण होते. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही आम्ही त्याच वेगाने काम करू. पुढील ४ वर्ष भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दुप्पटीने मजबूत करू. ट्रम्प यांच्याप्रमाणे मलाही भारतीयांच्या हिताला सर्वोच्च ठेवून काम करायचे आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, जेव्हा ट्रम्प मेक अमेरिका ग्रेट अगेन बोलतात, प्रत्येकाला त्यातून प्रेरणा मिळते. भारतही 'विकसित भारत २०४७' देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्ष होतील तोपर्यंत भारताला विकसित करण्याचा संकल्प त्याला आज नवी गती आणि नवी ऊर्जा मिळतेय. अमेरिका जगातील सर्वात जुना लोकशाही देश आणि भारत महान लोकशाही असलेला देश यामुळे आमच्या दोघांची भेट म्हणजे १ प्लस १, २ नव्हे तर एक और एक ग्यारह आहे आणि ही ताकद विश्वाच्या कल्याणासाठी कामाला येईल. मी माझ्या मित्राचे पुन्हा आभार मानतो, आपण परत एकदा प्रगतीच्या दिशेने नवं शिखर गाठण्यासाठी पुढे जाऊ असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.