हाँगकाँग: जाएंट पांडा प्रजातीचा बंदिवासात राहणारा सर्वात वयोवद्ध प्राणी म्हणून ख्याती असलेल्या ‘जिआ जिआ’ नावाच्या ३८ वर्षे वयाच्या पांडा मादीला २ आठवड्यांत आजारपणाने प्रकृती खूपच खालावल्याने अखेर येथील प्राणिसंग्रहलयात दयामरण देण्यात आले.‘जिआ जिआ’ या नावाचा चिनी भाषेत अर्थ होतो ‘चांगले’. जाएंट पांडाची ही मादी येथील ‘ओशन पार्क’ प्राणिसंग्रहलायात होती. पूर्वीची ब्रिटिश वसाहत असलेले हाँगकाँंग ब्रिटनने पुन्हा चीनकडे हस्तांतरितकेले त्याच्या व्दितीय वर्षपूर्ती निमित्त सन १९९९ मध्ये आणखी एका नर पांडासोबत ही पांडा मादी भेट म्हणून देण्यात आली होती.‘ओशन पार्क’ने त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनानुसार ‘जिआ जिआ’ एरवी दिवसाला सर्वसाधारणपणे १० किलो अन्न खायची. परंतु गेल्या काही दिवसांत हे प्रमाण दोन किलोवर आले. तिची अन्नावरची वासना उडाली. तिला चालणेही मुश्किल झाले. ती सदोदित ग्लानी आलेल्या अवस्थेत पहुडलेली असायची. तिला आणखी यातना सहन कराव्या लागू नयेत या भूतदयावादी हेतूने तिला रविवारी पशुवैद्यकांनी दयामरण दिले. (वृत्तसंस्था)>विनष्टतेच्या मार्गावरजंगलतोडीने नैसर्गिक अधिवास नष्ट होत गेल्याने जाएंट पांडा ही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पांडा मादी वर्षातून फक्त २४ ते ३६ तास माजावर येत असल्याने त्यांचे अत्यंत कमी संख्येने होणारे प्रजनन हेही याचे एक कारण आहे. चीनने २०१४ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार १,६६४ जंगली जाएंट पांडा शिल्लक होते.
सर्वात वृद्ध पांडाला दयामरण
By admin | Updated: October 18, 2016 04:57 IST